संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
राज्यात भूजलाची पातळीत सातत्याने घट होत चालली असून ही बाब अतिशय चिंतेची आहे. या भूजलपातळीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने केंद्राने अटल भूजल योजना सुरु केली आहे.यामध्ये माळशिरस तालुक्यातील ६६ गावांचा समावेश झाला असून याभूजल पातळीत वाढ होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेसाठी व या योजनेवर विचार विनिमय करण्यासाठी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तहसीलदार जगदीश निंबाळकर,गटविकास अधिकारी स्मिता पाटील,पंचायत समिती सभापती शोभाताई साठे,माजी सभापती धैर्यशील मोहिते पाटील,माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील,भूजल सर्व्हेक्षणचे निंबाळकर,तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे,कल्याणराव देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या योजनेमध्ये पाणीबचत,जलसंधारण,भूजल पुनर्भरण,भूजल व्यवस्थापन याबाबत काम करणाऱ्या विविध शासकीय यंत्रणांचे कृती संगमातून भूजलाच्या शाश्वत विकासाकरिता व्यवस्थापन आराखडा तयार करणे व भूजलपातळी वाढणेकामी आवश्यक त्या उपाययोजना करणेबाबतची माहिती यशदा पुणेचे प्रवीण प्रशिक्षक अजय राऊत यांनी दिली तर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे निंबाळकर यांनी आराखडा बेसलाईन सर्व्हेची माहिती दिली. त्याचबरोबर सर्व विभागांच्या माध्यमातून माहिती संकलित करणे व प्रत्येक गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जल अर्थसंकल्प व जलसुरक्षा आराखडे त्वरित करणेकामी गाव पातळीवर ग्रामसेवक,तलाठी व कृषी सहाय्यक यांनी एकत्रित येऊन जलसुरक्षा आराखडे करण्याबाबत तसेच तालुक्यातील शोषित,अति शोषित व अंशतःशोषित गावांची भूजल पातळी वाढणेसाठी व भूजल पाणी गुणवत्ता सुधारणेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे व त्याकामी लोकांचा सहभाग मिळविण्यासाठी आम्ही लोकांना जागृत करून अधिक लोकसहभाग मिळणेसाठी प्रयत्न करू, असे आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.तसेच निरा उजवा कालवा व उजनी कालव्यावरील शेतक-यांच्या पाणी वापर संस्था सक्षम होण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख यांनी खबरदारी घ्यावी व याबाबत आवश्यक पावले उचलावीत अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
सदर आढावा बैठकीचे प्रास्ताविक व आभार गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले.
योजनेची वैशिष्टे :- भूजल पुनर्भरण उपाय योजना करणे, रिचार्ज फ्रेंच व रिचार्ज सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, दगडी बांध व विहीर पुनर्भरण तसेच तलावातील गाळ काढणे अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे.कृषी विभागामार्फत पिक संरचना, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे, मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना करणे आदीचा समावेश आहे.
मृदा व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामविकास विभाग, ग्रामपंचायत त्याचबरोबर आमदार व खासदार फंड,वित्त आयोगाचे व मनरेगा इत्यादी वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून कृती संगम करून कामे केली जाणार आहेत.

संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा