
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक धोंडीराम माळी यांच्या शरीराला स्टेनलेस स्टील व नाणी या धातूच्या वस्तू चिटकत असल्याची चमत्कारिक घटना आज निदर्शनास आली आहे.त्यांनी याबाबतचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर ही बाब सर्वांना समजली.त्यांनाही या घटनेचे कुतूहल वाटले व शास्त्रीय सत्य काय आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. ‘प्रगल्भनायक’चे संपादक लक्ष्मणराव खटके यांनाही या घटनेची प्रचिती आली. त्यांच्याही शरीराला या वस्तू चिटकत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य सांगली येथील डॉ.प्रदीप पाटील यांनी अशा घटनांबाबत शरीरातील ‘सीबम’ या पदार्थाचा तसेच भौतिकशास्त्रातील ‘घर्षण’ विज्ञानाचा परिणाम असल्याचे समाजमाध्यमाद्वारे मत व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी रोमानियाच्या जगप्रसिद्ध ओरेल रेनालू नावाच्या माणसाचा व चमत्कारांचा कर्दनकाळ असलेल्या जेम्स रँडीच्या एका साध्या प्रयोगाचा हवाला दिला आहे.

आटपाडी येथील अशोक माळी हे आपल्या शेतात असताना त्यांना टीव्हीवर एका व्यक्तीच्या अंगाला वस्तू चिटकत असल्याची बातमी पाहिली.कुतुहलाने त्यांनी हा प्रयोग स्वतःवरही केला. तर त्यांनाही या वस्तू आपल्या शरीराला चिटकत असल्याची अनुभूती आली. त्यांनी याबाबत पुन्हा खात्री करून त्याचा व्हिडिओ तयार केला व सोशल मीडियावर व्हायरल केला.त्यांच्या शरीरावर चमचा, प्लेट, उलतन,ताट यासारख्या स्टेनलेस स्टील धातूच्या वस्तू तसेच धातूची रुपया, दोन रुपये, पाच-दहा रुपयेची नाणी चिटकत असल्याची अनुभूती आली.परंतु यामागील भौतिकशास्त्रीय कारणाचा उलगडा झालेला नव्हता.अशोक माळी यांनाही या घटनेबद्दल कुतूहल वाटत आहे. परंतु त्यांनी covid-19 लसीकरणाचा परिणाम किंवा अन्य कोणत्याही चमत्कारिक दाव्याला दुजोरा दिला नाही. किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. ते या घटनेबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे मत मांडतात. हा प्रकार कशामुळे घडतो हे जाणून घेण्याची इतरांप्रमाणे त्यांचीही उत्सुकता व जिज्ञासा आहे.
महाराष्ट्रात अन्यत्र काल कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या टीमने फोल ठरविला आहे.

डाॅ.प्रदीप पाटील यांनी या घटनेमागील विज्ञान स्पष्ट केले आहे. समाज माध्यमाद्वारे एक पोस्ट व्हायरल करून त्यांनी आपले शास्त्रोक्त मत व्यक्त केले आहे. त्यासाठी रोमानियाच्या जगप्रसिद्ध अशा 26 किलो वजनाची वस्तू छातीवर घेऊन चिकटवून ठेवलेल्या ओरेल रेनालू नावाच्या माणसाचा व चमत्कारांचा कर्दनकाळ असलेल्या जेम्स रँडीचा एक साधा प्रयोग प्रकाशझोतात आणला आहे.

आपल्या शरीरातून घाम येतो आणि तो त्वचेवर साचतो,या घामामध्ये ‘सीबम’ हा चिकट द्राव असतो. तो त्वचेतील सीबॅशियस ग्रंथीतून पाझरत असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये या सीबमचे प्रमाण कमी अधिक असते.हा सीबम चिकट असतो आणि त्वचेवर चीकचीकपणा निर्माण करतो. त्यामुळे केवळ धातुच्याच नव्हे तर प्लास्टिकच्या वस्तूदेखील त्याला चिकटतात. ज्या व्यक्तींच्या त्वचेवर हा सीबम पसरलेला असतो तेथे या वस्तू चिकटतात. हा सीबम जर तिथून काढून टाकला तर वस्तू चिकटायच्या थांबतात. शर्ट घालून वस्तू चिकटत नाहीत. ज्यांची त्वचा लवचिक आहे व त्या त्वचेवर केस नाहीत अशांना या सीबम चिकट द्रवाचा खूप मोठा फायदा होतो आणि वस्तू पटकन चिकटतात.


दुसरे कारण भौतिकविज्ञानाचे आहे.गुळगुळीत अशा पृष्ठभागावर एखादी वस्तू ठेवली तर ती घसरते कारण गुरुत्वाकर्षण शक्ती त्याला खाली खेचते.जेव्हा आपली उघडी त्वचा असते त्याच्यावर धातूच्या वस्तू चिकटवतात तेव्हा त्या वस्तू आणि त्वचेचा पृष्ठभाग यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोन न राहता तो त्याच्या पेक्षा कमी असतो. हा तिरकस झालेला 45 अंशाच्या आसपासचा कोन जेव्हा तयार होतो तेव्हा गुरुत्वाकर्षण हे कमी होते आणि वस्तू खाली पडत नाही. म्हणजेच हे फ्रिक्शन किंवा घर्षण विज्ञान त्वचेला वस्तू चिकटून राहण्यास मदत करते. मान आणि छाती याचा पृष्ठभाग असा असतो. छाती खाली फुगीर असते व मानेकडे निमुळती होत जाते. तेथे हा आवश्यक कोन सहज मिळतो आणि जेथे केस नसतील तेथे चिकटण्यास अडथळा निर्माण होत नाही.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक