
चिकन-मटण विक्री दुकाने व हॉटेल-ढाब्यांच्या ‘वेस्टेज’मुळे समस्यांचा विळखा !
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/भिवघाट:
भिवघाट परिसरातील चिकण-मटण विक्रेते व हॉटेल,ढाबा चालक व्यावसायातील टाकाऊ कचरा घाटातील रस्त्यालगत फेकून देत असल्यामुळे दुर्गंधी, कुत्र्यांचा उपद्रव व परिसरातील श्री भीमाशंकर व म्हसोबा मंदीराच्या पवित्र्याबरोबरच तलावातील दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने कठोर कारवाई करून हा प्रकार कायमस्वरूपी व पूर्णपणे थांबवावा अशी मागणी हिवतड येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश साळुंखे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
भिवघाट परिसरातील चिकन व मटण विक्रेते दुकानदार चिकनचे पंख,आतडी व इतर टाकाऊ भाग तसेच बोकड कापल्यानंतर चरबटासारखा व अन्य टाकाऊ भाग साठवणूक करून संध्याकाळी,सोयीनुसार घाटातील रस्त्यालगत फेकून देतात. तसेच सातारा-विजापूर हा मुख्य हायवे असल्यामुळे भिवघाटावरील धाबे परिसरात प्रसिद्ध आहेत.तेथे जेवणावळीसाठी अनेक लोक येतात.या हॉटेल व ढाबा चालकांकडून मटणासाठी वापरलेल्या पशुपक्ष्यांचे टाकाऊ पदार्थ तसेच हॉटेलचे शिल्लक खरकटे पदार्थ गोळा करून याच भागात फेकण्याचा प्रकार घडत आहे.घाटातील हा भाग उताराचा आहे. भिवघाटकडील पहिल्याच वळणावर अशा टाकाऊ पदार्थांचा रस्त्यालगत खच पडलेला असतो. हे पदार्थ रस्त्यावर येतात.तसेच पावसामुळेही हे दुर्गंधीयुक्त पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर उताराने व मिळेल त्या सोयीच्या मार्गाने खाली वाहत जाऊन घाट पायथ्याशी असलेल्या तलावामध्ये जातात. याच परिसरात प्राचीन जागृत देवस्थान श्री भीमाशंकर मंदिर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध असे श्री म्हसोबा देवस्थान मंदिर याच तलावालगत आहे. खरकटे व पशुपक्ष्यांच्या टाकाऊ पदार्थामुळे या देवालयांच्या धार्मिक पावित्र्याला बाधा येत आहे.त्यामुळे अशी घटना समजताच काही भक्तगण संतापत आहेत.तसेच अनेकवेळा या तलावातील पाणी काहीजण पिण्यासाठी वापरतात. त्यांना या दुर्गंधीयुक्त प्रकाराबद्दल कल्पना नाही. त्यामुळे असे दूषित पाणी पिल्यामुळे नागरिकांना आरोग्याचा त्रास निर्माण होण्याची शक्यता आहे. दूषित पाण्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे.या खरकट्या व टाकाऊ पदार्थावर उपजीविका करणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्याही भरपूर झाली आहे. त्यामुळे या परिसरात बऱ्याच वेळा मोकाट कुत्र्यांची गर्दी जमते. टाकलेल्या पदार्थावर ताव मारण्याच्या नादात त्यांच्यामध्ये कलागती-कळवंडी होऊन रस्त्यावर अचानक येणाऱ्या त्यांच्या खंडव्यामुळे दुचाकी व चारचाकी गाडीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास होतो. काही दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.तसेच मोकाट कुत्री काहीवेळा अंगावर धावून येतात.या दुर्गंधीयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, श्री भीमाशंकर व म्हसोबा मंदिरांच्या पावित्र्याचा धार्मिक प्रश्न, तलावातील पाणी दूषित होण्याचा प्रकार घडत असल्यामुळे हे खरकट्या व अन्य टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट ज्या-त्या मटन-चिकन विक्रेत्याने व हॉटेल-ढाबा चालकाने सुरक्षितपणे लावावी.त्याचा सार्वजनिक उपद्रव होऊ नये, याची काळजी घ्यावी. यासाठी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश साळुंखे यांनी काही संबंधित दुकानदार व हॉटेल,ढाबे चालकांना वारंवार भेटून हा प्रकार थांबवणेबाबत सांगितले आहे. मात्र हा प्रकार अद्याप थांबला नाही.त्यामुळे त्यांनी आता प्रशासनाकडे धाव घेतली आहे. प्रशासनाने जर याबाबत योग्य ती पावले उचलली नाहीत, तर या प्रश्नावर सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक