पुण्यात आंबिल ओढ्यात ‘राडा’!


झोपडपट्टीतील घरांवर महापालिकेचा ‘बुलडोझर’!

अनेक कुटुंबे बेघर, रहिवासी संतप्त!


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पुणे:

पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील झोपडपट्टी उठवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने आज सकाळी चालू केला आहे.महानगरपालिकेने घरावर जेसीबी (‘बुलडोझर’) फिरवण्याचा आणि घरे पाडण्याचा प्रकार सकाळी सुरू केला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवशी अनेक रहिवासी,नागरिक बेघर होऊन आक्रमक झाले आहेत.
पोलिस प्रशासनाने त्यापैकी काही लोकांना ताब्यात घेतले असल्याचे आणि त्यांना मारहाण करीत असल्याचे लहान मुलांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर घरातील कर्तेपुरुष पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याच्या महिलांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणतीही नोटीस न देता हा प्रकार सुरू आहे.कोरोना महामारीचे संकट सुरू असतानाच व पावसाळा सुरू होत असतानाच ही कारवाई केली आहे.त्यामुळे अचानक नागरिकांनी कुठे जायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचे सुरुवातीला पुनर्वसन करून व पूर्व नोटिसा देऊन ही कारवाई करावी अशी लोकांची भावना आहे.
अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.तर अनेकजण संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. लहान मुले व झोपडपट्टीतील राहणारा महिलावर्ग पुर्णपणे गोंधळून गेला आहे. पालिकेने प्रशासन व पोलीस बळ याचा वापर सुरू केला आहे, तर वीज मंडळामार्फत घराची कनेक्शन तोडून घरांवर जेसीबी चालवला जात आहे.
पालिकेच्या माध्यमातून घरातील वस्तू गोळा करून सील करून दुसरीकडे नेत आहेत. तर घरावर जेसीबी चालवण्याचे काम सुरूच आहे.
या लोकांना याठिकाणी वीज पुरवठा केला आहे.तसेच मूलभूत सुविधांचा पुरवठा केला असल्यामुळे अचानक ही कारवाई कशी केली? असा सवाल करत या कारवाईबाबत नागरिक संतप्त झाले आहेत. अनेक नागरिक बेघर होऊन त्यांची लहान मुले, स्त्रिया व संसार उघड्यावर आला आहे. काहीजणांनी ही कारवाई थांबविण्यासाठी या कारवाईविरोधात आत्मदहनाचाही प्रयत्न केला आहे.
कोणत्याही नोटीसशिवाय ही कारवाई केली जात आहे, तसेच आंबील ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातला आहे, असे आरोप नागरिकांनी केले आहेत.