
आ.निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये दोन जोडप्यांनी बांधली लग्नगाठ!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पारनेर:
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरचा डंका संपूर्ण महाराष्ट्रभर वाजत आहे. आमदार निलेश लंके स्वतः या रुग्णांबरोबर आपली दिनचर्या पूर्ण करतात. तसेच रुग्णांसाठी आरोग्य सेवेबरोबरच मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम व इतर विविध उपक्रम राबवले जातात. आता तर ‘शरद पवार आरोग्य मंदिर’ या सेंटरमध्ये दोन जोडप्यांनी लग्नगाठ बांधली आहे. अनिकेत सखाराम व्यवहारे व आरती नानाभाऊ शिंदे त्याचबरोबर जनार्दन पुंजाजी कदम व राजश्री काळे यांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात या सेंटरमधून केली आहे.
अनलॉकची प्रक्रिया महाराष्ट्रभर सुरू झाली असतानाच त्यामध्ये विवाह विधींनाही अटींच्या अधीन राहून सवलत देण्यात आली आहे. विवाहामध्ये मोठ्या प्रमाणात डामडौल व खर्च ठरलेला असतो. परंतु कोरोना काळात घडलेले विवाह वेगळ्या पद्धतीने चर्चेत आहेत. तसेच ते कमी खर्चिकही झाले. तर काही विवाहांनी नवीन पायंडाही पाडला आहे.असाच हा विवाह घडून आला आहे.
या दाम्पत्यांनी लग्नाच्या बेसुमार,मोठ्या खर्चाला फाटा दिला.अवांतर खर्चाला आळा घालून ती रक्कम कोरोना रुग्णांच्या कामी यावी, या सामाजिक जाणिवेतून या दोन्ही नववधू-वरांंनी सर्व रुग्णांसाठी मास्क,सॅनिटायझर,पीपीई किट,अत्यावश्यक औषधे या कोविड सेंटरला भेट दिली. त्याचबरोबर त्यांनी 37 हजार रुपयांची आर्थिक मदतही केली.वराडी मंडळी, नातेवाईक, हितचिंतक, मित्रमंडळी समजून कोरोना रुग्णांना स्नेहभोजनही दिले.
शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करून तसेच कोरोना तपासणी करून हा अनोखा शुभमंगल विवाह कोविड सेंटरमध्ये पार पडला. कोरोना रुग्णांचा आशीर्वाद घेऊन या नवदांपत्यांनी नवीन वैवाहिक जीवनास प्रारंभ केला.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद