बंधाऱ्यात बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले!

 प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील जांभुळणी गावच्या ओढ्यावरील बंधाऱ्यात वाहून गेलेल्या तिघा भावंडांचेही मृतदेह बंधाऱ्यात सापडले.  घाणंद येथील वैभव लहू होनमाने (वय 18 वर्षे) तसेच त्याचे सख्खे चुलत भाऊ आनंदा अंकुश होनमाने (वय 17) व विजय अंकुश होनमाने (वय 16) अशी तिन्ही भावंडे रविवारी सायंकाळी जांभुळणी परिसरातील ओढ्यावर असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये गेली होती. ही तीन भावंडे मासेमारीसाठी गेली होती की पोहण्यासाठी गेली होती, याबाबत अद्याप कोणालाही कल्पना नाही.परंतु बंधाऱ्यात गेलेली असताना तिघांचाही वाहून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एकाला वाचविताना दुसरा, दुसऱ्याला वाचवताना तिसरा असे प्रवाहाबरोबर वाहत जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची सध्या घटनास्थळी चर्चा सुरू होती.सायंकाळपासूनच बंधाऱ्यामध्ये  त्यांच्या मृतदेहाची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.सायंकाळी घटना घडल्यामुळे रात्रभर  अंधारात  शोधमोहिमेला  अडथळा येत होता.  तसेच  बंधाऱ्यामध्ये  वेड्या बाभळीचेही साम्राज्यामुळे  त्याचाही  शोध मोहिमेत अडथळा येऊन अंगाला काटे लागण्याचा  धोका  होता. बंधाऱ्यात पाणी भरपूर असल्यामुळे  मृतदेह सहजासहजी सापडणे अवघड झाले होते. जांभुळणी,घाणंद गावांसह  परिसराच्या गावातील काही युवक वर्ग यासाठी सहकार्य केले.प्रशासकीय यंत्रणेसह रेस्क्यू पथक शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या मदतीला परिसरातील गावातील 25 ते 30 तरुणांची फौज ही कार्यरत होती. आमदार गोपीचंद पडळकर सकाळी घटनास्थळी दाखल झाले. सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर रात्रीपासून घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहिमेला सहकार्य करीत होते.जांभुळणी येथील बळिराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवराम मासाळ,पांडुरंग झंजे व घाणंद गावचे सरपंच नितीन होनमाने तसेच स्थानिक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते मदत कार्यासाठी धावून आले. या तीन भावंडांपैकी वैभव लहू होनमाने याचा  मृतदेह वाजण्याच्या सुमारास सापडला. तो बंधाऱ्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर आता आनंदा अंकुश होनमाने  व विजय अंकुश होनमाने यांचेही मृतदेह बंधाऱ्यात सापडले असून तेही बाहेर काढण्यात आले आहेत. बंधाऱ्याच्या दरवाजापासून जवळच काही फुटांवर हे मृतदेह आढळून आले.