जांभुळणीच्या बंधाऱ्यात बुडालेल्या तीन भावंडापैकी एकाचा मृतदेह सापडला!

 दोघांच्या मृतदेहाची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरुच!

पडळकर बंधू घटनास्थळी; शोधमोहिमेत सहकार्य! रेस्क्यू पथकासह युवकांची फौजही मदतीला!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यातील घाणंद येथील जांभुळणी गावच्या ओढ्यावरील बंधाऱ्यात वाहून गेलेल्या तिघा भावंडांपैकी एकाचा मृतदेह बंधाऱ्यात सापडला असून अन्य दोघांच्या मृतदेहाचा शोध घेण्याची मोहीम गतीने व युद्धपातळीवर सुरू आहे.वैभव लहू होनमाने याचा मृतदेह सापडला आहे.  घाणंद येथील वैभव लहू होनमाने (वय 18 वर्षे) हा इयत्ता बारावीतील मुलगा तसेच त्याचे सख्खे चुलत भाऊ आनंदा अंकुश होनमाने (वय 17) इयत्ता अकरावी व विजय अंकुश होनमाने (वय 16) इयत्ता दहावी अशी तिन्ही भावंडे रविवारी सायंकाळी जांभुळणी परिसरातील ओढ्यावर असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये गेली होती. या बंधाऱ्यामध्ये मत्स्यशेतीचा प्रकल्प सुरू आहे. ही तीन भावंडे मासेमारीसाठी गेली होती की पोहण्यासाठी गेली होती, याबाबत अद्याप कोणालाही कल्पना नाही.परंतु बंधाऱ्यात गेलेली असताना तिघांचाही वाहून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एकाला वाचविताना दुसरा, दुसऱ्याला वाचवताना तिसरा असे प्रवाहाबरोबर वाहत जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याची सध्या घटनास्थळी चर्चा सुरू आहे.सायंकाळपासूनच बंधाऱ्यामध्ये  त्यांच्या मृतदेहाची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.सायंकाळी घटना घडल्यामुळे रात्रभर  अंधारात  शोधमोहिमेला  अडथळा येत होता.  तसेच  बंधाऱ्यामध्ये  वेड्या बाभळीचेही साम्राज्य आहे.  त्यामुळे  त्याचाही  शोध मोहिमेत अडथळा येऊन अंगाला काटे लागण्याचा  धोका  होता. बंधाऱ्यात पाणी भरपूर असल्यामुळे  मृतदेह सहजासहजी सापडणे अवघड झाले आहे. जांभुळणी,घाणंद गावांसह  परिसराच्या गावातील काही युवक वर्ग यासाठी सहकार्य करत आहे.प्रशासकीय यंत्रणेसह रेस्क्यू पथक शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांच्या मदतीला परिसरातील गावातील 25 ते 30 तरुणांची फौज ही कार्यरत आहे. आमदार गोपीचंद पडळकर सकाळीच घटनास्थळी दाखल झाले असून सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर रात्रीपासून घटनास्थळी उपस्थित राहून शोधमोहिमेला सहकार्य करीत आहेत.जांभुळणी येथील बळिराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवराम मासाळ व घाणंद गावचे सरपंच नितीन होनमाने तसेच स्थानिक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते मदत कार्यासाठी धावून आले आहेत.आत्ताच या तीन भावंडांपैकी वैभव लहू होनमाने याचा  मृतदेह सापडला असून तो बंधाऱ्यातून बाहेर काढण्यात आला आहे.