पैशाच्या वादातून साडूनेच केला साडूचा खून!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/औरंगाबाद:

पैशाच्या वादातून कुख्यात गुंडाची साडूनेच धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. जमीर शब्बीर खान असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.  जमीर खानची औरंगाबादमध्ये कुख्यात गुंड म्हणून दहशत होती. त्याच्यावर अनेक प्रकारच्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. चोरी,घरफोडी यासारख्या गुन्ह्यांमध्ये अनेकवेळा त्याला अटक करण्यात आली होती. त्याचा साडूबरोबर पैशाचा वाद होऊन त्यातून त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.जमीर खान आणि त्याचा साडू शोएब खान यांचा पैशावरून वाद झाला होता. वारंवार त्यांच्यात असा वाद व्हायचा. परंतु त्या-त्या वेळी तो वाद मिटायचा. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान शहाजान मंडीतील जैन धर्मशाळेच्या एका बिल्डिंगजवळ जमीर उभा असताना त्याचा साडू शोएब खान एका मित्रासह तेथे आला. पैशावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तो वाद इतका विकोपाला गेला की, साडू शोएब खानने त्याच्या मित्रासह धारदार शस्त्राने जमीरवर घाव घातले. शोएबने जमीरच्या छातीवर व पोटावर धारदार शस्त्राने हे वार केले. त्यावेळी तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. साडू शोएब व त्याचा मित्र यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी काही तासांच्या आतच त्याला अटक केली.