महिला पेशंटसाठी ‘ही’ सुरक्षा तजवीज!

कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करा: जिल्हाधिकारी  डॉ.अभिजीत चौधरी

 अनुचित प्रकार घडल्यास राज्य महिला आयोगाच्या हेल्पलाईन व दूरध्वनीवर संपर्क करा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दि. 18 मे 2021 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. या मानक कार्यप्रणालीचे संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे. अनुचित प्रकार घडल्यास राज्य महिला आयोगाच्या हेल्पलाईन व दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले आहे.कोविड-19 ने आजारी असलेल्या महिलेबरोबर कोविड-19 केंद्रामध्ये अनुचित प्रकार घडल्यास मदतीसाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा हेल्पलाईन क्रमांक, आयोग कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक आणि विभागीय कार्यालय दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. हेल्पलाईन 7477722424, आयोग कार्यालय  022-26592707, आयोगाचे विभागीय कार्यालय क्रमांक – पुणे 020-26330052, अमरावती 0721-2566486, नाशिक 0253-2237422, कोकण 022-25917655, नागपूर 0721-2640050, औरंगाबाद 0240-2325570.कोविड केंद्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढीलप्रमाणे मानक कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे – कोविड-19 सेंटर मधील आंतररूग्ण महिलांकरिता (अपवादात्मक परिस्थिती वगळता) स्वतंत्र वॉर्ड असणे आवश्यक आहे. महिला कक्षेत पुरूष सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येऊ नये. अपवादात्मक परिस्थितीत पुरूष सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली असल्यास त्यांनी महिला सहाय्यकासोबतच महिला कक्षेत प्रवेश करावा. कोणत्याही पुरूष कर्मचारी यांनी महिला परिचारिका किंवा एखाद्या स्त्री सहाय्यकासोबत महिला वॉर्डात दरवाज्यावर नॉक करूनच प्रवेश करावा. महिलांच्या कोविड-19 निवारण कक्षात रूमची साफसफाई तसेच बेड क्लिनिंग किंवा इतर साफसफाई करण्याकरिता तसेच पॅन्ट्री सुविधा देण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. महिला कक्षामध्ये रात्रीच्या वेळी महिला सहाय्यक असणे आवश्यक आहे. महिला कक्षेत पुरूष सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येऊ नये. अपवादात्मक परिस्थितीत पुरूष सहाय्यकाची नियुक्ती केली असल्यास पुरूष सहाय्यकानी महिला सहाय्यकासोबतच महिला कक्षेत प्रवेश करावा. कोविड-19 सेंटर मधील आंतररूग्ण महिलाकरिता कोणत्याही वैद्यकीय चाचण्या उदा. युएसजी, इकोकार्डीओलॉजी, एक्सरे, सी.टी. स्कॅन, ईसीजी, ईईजी करताना त्याठिकाणी स्त्री सहाय्यकाची उपस्थिती असणे आवश्यक आहे. संबंधित महिला कक्षाच्या इन्चार्ज सिस्टरनी याबाबत जातीने लक्ष देवून काटेकोरपणे पालन करावे.महिला कोविड कक्षामध्ये साफसफाईचे कामकाज नियोजीत वेळापत्रकानुसार तसेच विहित वेळेतच पार पाडावे सदर कामकाज संपल्यानंतर संबंधित कर्मचारी महिला कक्षेत रेंगाळत रहाणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी. महिला कोविड-19 सेंटरमध्ये प्रवेश करण्याच्या व बाहेर जाण्याच्या सर्व मार्गावर किंवा दरवाज्यावर सीसीटीव्ही असणे अत्यंत आवश्यक आहे. कोविड सेंटरच्या प्रवेशव्दारावर सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे. कोविड सेंटर मध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या नावाची तसेच वेळेची नोंद संबंधित नोंदवहीमध्ये प्रवेश केलेल्या व्यक्तीची ओळख पटविणे शक्य होईल. महिला कोविड-19 सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्सेस, हाऊसकिपिंग, सुरक्षा रक्षक तसेच इतर सर्व कर्मचारी यांनी आपल्या परीने महिला रूग्णाच्या सुरक्षेची आवश्यक ती दक्षता घ्यावी. महिला कोविड सेंटरमध्ये कोणतीही व्यक्ती संशयास्पद रितीने फिरताना किंवा टेहळणी करताना आढळल्यास त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व प्रशासनाला याबाबतची माहिती द्यावी. याबाबत महिला कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना वरिल सुचना स्वतंत्रपणे देण्यात याव्यात व सजग रहाण्याचे निर्देश देण्यात यावेत. वरिल कार्यपध्दती प्रसुत झालेल्या कोविडग्रस्त महिला रूग्णांच्या कक्षाला लागू राहतील.महिला कोरोना-19 कक्षामध्ये महिला तक्रार निवारण समिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही महिलेला तक्रार करणे सुलभ होईल. तक्रारीकरिता स्वतंत्र हेल्पलाईन नंबर असणे आवश्यक आहे व त्याची संपूर्ण माहिती दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. तसेच अशिक्षीत महिलांना तक्रार निवारण समितीबाबत सिस्टर इंचार्ज यांनी माहिती देणे आवश्यक आहे. महिला कोविड-19 सेंटर मधील कक्षामध्ये 20 रूग्णाकरिता स्वतंत्र 1 बाथरूम व 1 संडास सुस्थितीत असणे आवश्यक आहे. महिला कोविड कक्षामध्ये पाण्याचा पुरवठा तसेच विजेची 24 तास सुविधा असणे आवश्यक असून कोविड कक्ष हवेशीर असावा. कोविडबाधीत गर्भवती महिलेला आंतररूग्ण असताना सेंटरमध्ये काही त्रास उद्भवल्यास जवळच्याच रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यासाठी तात्काळ रूग्णवाहीकेची सोय उपलब्ध करून देण्यात यावी व अशा स्त्री रूग्णाबरोबर एक महिला सहाय्यक असणे आवश्यक राहील याची सिस्टर इन्चार्ज यांनी दक्षता घ्यावी.कोविड रोगामुळे मृत झालेल्या महिलांचा मृतदेह कपड्यात बांधताना पुरूष कर्मचारी यांच्याबरोबर महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच मृतदेह दुसरीकडे नेण्याकरिता पुरूष कर्मचारी यांच्याबरोबर महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. कोविड सेंटरमध्ये दर्शनी भागावर पॅनिक अलार्म बटन आवश्यक आहे. तसेच त्याची माहिती कोविड सेंटरमधील महिलांना देण्यात यावी. कोविड सेंटरमध्ये गरोदर महिलासाठी कक्षाच्या सुरवातीलाच आरक्षित खाटा ठेवणे आवश्यक आहे. कोविड सेंटरमध्ये अग्निशामक यंत्रणा असणे आवश्यक आहे.