८० हजार रुपयांची हातभट्टी दारू पकडली!माळशिरसमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद!

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथून माळशिरसकडे छोटा हत्ती टाटा पिकअप मधून ८० हजार रुपये किंमतीची हातभट्टी दारू अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात असताना माळशिरस पोलिस पथकाने सापळा रचून ताब्यात घेतली.याप्रकरणी चांदापुरी येथील तिघांवर व माळशिरस येथील दोघांवर गुन्हा नोंद केला आहे.शकील जलीफ पठाण, तौफिक सिकंदर पठाण, पिंटू उर्फ संतोष सरतापे (तिघेही रा. चांदापुरी ता. माळशिरस), सागर लोंढे, धनाजी पवार (दोघेही रा. माळशिरस) यांच्याविरुद्ध माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ३० मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक छोटा हत्ती टाटा पिकप मधून एक इसम हातभट्टीची दारू माळशिरसच्या दिशेने घेऊन येत असल्याची माळशिरस पोलिसांना बातमी मिळाली. पोलीस निरीक्षक रतनदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातील महारनवर,भोसले, रणदिवे, लेंडवे, कासदेकर, शेंडगे यांनी माळशिरस पिलीव रस्त्यावर नीरा उजवा कॅनॉलजवळ सापळा लावला.संशयित छोटा हत्ती टाटा पिकप वाहन येताच ते थांबवले व त्याची तपासणी केली. त्यामध्ये आंबट उग्र घाण वासाची एक हजार लिटर हातभट्टी दारू आढळून आली.या वाहनामध्ये असणारे आरोपी शकील जलीफ पठाण, तौफिक सिकंदर पठाण यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला. त्यावेळी ही हातभट्टी दारू पिंटू उर्फ संतोष सरतापे याच्याकडून घेऊन सागर लोंढे व धनाजी पवार यांना अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. ८० हजार रुपये किंमतीची हातभट्टी दारू व छोटा हत्ती पीकअप किंमत अंदाजे चार लाख रुपये असे एकूण चार लाख ८० हजार रुपये किंमतीचे सामान ताब्यात घेतले. या पाच जणांविरुद्ध माळशिरस पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या