विवाहितेचा दोन मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न!बालकांचा दुर्दैवी अंत; महिला बचावली !
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
जत तालुक्यातील खैराव येथे विवाहित महिलेने रागाच्या भरात दोन मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रयत्नात दोन्हीही बालकांंचा दुर्देवी अंत झाला. महिला मात्र बचावली आहे. सुप्रिया शंकर बुरुंगले (वय. ४ वर्षे), समर्थ शंकर बुरुंगले (९ महिने ) असे मृत झालेल्या बालकांची नावे आहेत. रूपाली शंकर बुरुंगले (वय ४०,मुळगाव – लोणार ता .मंगळवेढा जि.सोलापूर) असे बचावलेल्या महिलेचे नाव आहे.रागाच्या भरात निष्पाप बालकांचा अंत झाल्याने लोणार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रूपाली शंकर बुरुंगले हिचे लोणार पडोळकरवाडी (ता .मंगळवेढा) येथील शंकर बुरुंगले यांच्याशी दुसरे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. खैराव येथे त्यांची शेतजमीन असून ते कुटुंबीयांसह राहतात. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या पूर्वी रूपालीने खैराव( ता.जत ) हद्दीतील गट नंबर १२७ मध्ये असलेल्या विहिरीतील पाण्यात दोन्ही मुलांसह उडी घेतली.त्यावेळी तिच्या हातातील दोन्ही मुले पाण्यात पडली.दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. रूपालीने मोटरीसोबत असलेल्या रस्सीला पकडल्याने ती बचावली.आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण नेमके समजू शकले नाही.घरातील किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. रागाच्या भरात आईमुळे दोन निष्पाप मुलांचा जीव गमावला. रूपाली हिने विहिरीत उडी मारल्यानंतर पोलीस पाटील कांताबाई रामचंद्र पाटील यांनी जत पोलिसांना घटनेबाबत कळवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले व घोडके, हवालदार संजय माने, पोलीस कर्मचारी समीर मुल्ला, महिला पोलीस मुजावर व गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रुपाली मोटारीच्या दोरीला धरून उभी होती. त्यावेळी स्थानिक लोकांनी तिला बाहेर काढले. तसेच विहिरीत बुडालेल्या लहान मुलांनाही विहिरीतून बाहेर काढून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून जत पोलिसांंत याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या