प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या!

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या!मृतदेहाचे चार तुकडे करून स्वयंपाकघरातच पुरले,सहा वर्षाच्या मुलीने घटनेचा केला खुलासा!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:

मुंबई उपनगरातील दहिसर पूर्वच्या खान कंपाउंड येथे पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली.प्रियकराबरोबर अनैतिक संबंध ठेवत असतानाच अचानक घरी आलेल्या पतीची हत्या केली.मृतदेहाचे चार तुकडे करून स्वयंपाकघरातच पुरण्यात आले. सहा वर्षाच्या मुलीने तिच्यासमोरच आईने केलेल्या घटनेचा आपल्या चुलत्याकडे खुलासा केला व हा प्रकार उघड झाला. दहिसर पोलिसांनी घराच्या स्वयंपाकघरात पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढला.नवऱ्याच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे. तिचा प्रियकर सध्या फरार आहे.

उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रईस शेखचे शाहिदा नावाच्या तरुणीसोबत 2012 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर हे दोघंही दहिसर पूर्वच्या खान कंपाउंडमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. रईस दहिसर पूर्व, रेल्वे स्टेशनच्या जवळच असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. त्याची पत्नी सहा वर्षाची मुलगी आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत घरीच असायची. याच काळात शेजारी राहणाऱ्या अनिकेत उर्फ अमित मिश्रासोबत तिचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले. ही गोष्ट रईसला समजली, तेव्हा त्याने या गोष्टीला विरोध केला. पतीचा रोजचा विरोध शाहिदाला नकोसा झाला होता, त्यामुळे तिनं आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.

अकरा दिवसापूर्वी शाहिदा आणि अमित अनैतिक संबंध ठेवत असतानाच अचानक रईस घरात आला. यावेळी दोघांनीही घरात असलेल्या चाकूने रईसचा गळा कापला. याच दरम्यान सहा वर्षाची चिमुकली अडीच वर्षाच्या मुलासोबत घरात आली. तेव्हा आईने तिला धमकी दिली, की कोणाला काही सांगितल्यास तिलादेखील वडिलांप्रमाणेच मारुन जमिनीत पुरेल.शाहिदानं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या शरीराचे चार तुकडे केले.त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात पुरला आणि त्याचा मोबाईल आपल्याजवळ ठेवला.खान कंपाउंडमध्ये राहणाऱ्या रईसच्या एका मित्राने तो बेपत्ता असल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली.

गोंडामधून घरच्यांचा फोन आल्यास ‘रईस न सांगताच कुठेतरी निघून गेला आहे’ असे शाहिदा सांगायची.शेवटी तीन दिवसांपूर्वी गावाहून रईसचा भाऊ खान कंपाउंडमधील रईसच्या घरी आला. यावेळी संधी मिळताच सहा वर्षाच्या मुलीने आपल्या चुलत्याला आईच्या विवाहबाह्य संबंधांबद्दलची सर्व माहिती दिली. यानंतर त्याने पोलीस ठाणेत जाऊन पोलिसांना ही सगळी घटना सांगितली. पोलिसांनी स्वयंपाकघरातील जमिनीत पुरलेला चार तुकड्यांचा मृतदेह बाहेर काढला.नवऱ्याच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.तिचा प्रियकर सध्या फरार आहे.