गावं बंद ‘कडं-काॅट’,पण दारू,गुटखा बिनबोभाट !

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

 जत ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी २१ मे ते १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तालुक्यात सर्व व्यवहार ठप्प आहेत. ग्रामीण भागासह शहरातील दुकाने जरी बंद असली तरी मावा, गुटखा, तंबाखू,बिडी,सिगारेट मात्र राजरोसपणे विकली जात आहे.24 तास दारू उपलब्ध होत असल्यामुळे तालुक्यांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे.गावाच्या चौकांमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या फेऱ्या होत असतात.  यावेळी मात्र गावात शांतता असते. पोलीस गेले की पुन्हा गाव पूर्वपदावर येतो. त्यामुळे गावातच पोलीस आणि होमगार्ड यांची  दिवसभरासाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणीही ग्रामस्थांमधून केली जात आहे.प्रत्येक गावांमध्ये देशीपासून विदेशीपर्यंत सर्व प्रकारची मदीरा ग्राहकांच्या सेवेशी उपलब्ध होत असल्यामुळे तरुण वर्गाच्या व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. हातभट्टीची दारू प्लास्टिक पिशवीमध्ये पार्सल मिळते. दारू पिल्यामुळे कोरोना होत नाही असा सल्लाही बेवडे देत असतात. कोरोनासाठी गावेच्या गावे जशी बंद केली, तशी गावातील दारूहद्दपार करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. शहरामध्ये कडक अंमलबजावणी केल्यामुळे शहरामधील रुग्ण संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्याच धर्तीवरती ग्रामीण भागातील लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.तशी अंमलबजावणीही सुरू आहे.रुग्ण संख्येवर याचा परिणाम होत आहे.

गावामध्ये राऊंड मारण्यासाठी पोलीस गाडी येते,पण अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करताना दिसून येत नाहीत. कारवाई फक्त तोंडावरचे मास्क खाली आलाय का? मोकाट कोण हिंडतोय का? आणि कुठे दुकान उघडे दिसते का? अशाच कारवाई करण्याकडे पोलीस लक्ष केंद्रीत करत आहेत. गावातील अवैध धंदे याकडेही पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.