आशा व गट प्रवर्तकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष, २४ मे रोजी देशव्यापी संप – कॉ.मिना कोळी

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत,सांगली:

कोविड -१९ च्या महामारीच्या संकटात रूग्ण व आरोग्य विभागातील दुवा असणाऱ्या आशा व गट प्रवर्तकांच्या मागण्याकडे राज्य व केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे दि.२४ मे रोजी देशातील सीटू संलग्न फेडरेशनच्या सर्व आशा व गट प्रवर्तक एक दिवशीय संपावर जात असल्याचे पत्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ.मिना कोळी,सचिव कॉ.उमेश देशमुख ,जिल्हा संघटक कॉ.हणमंत कोळी यांच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,जिल्हाधिकारी सांगली,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.सांगली,महापालिका आयुक्त,सांगली यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.कोरोना महामारीमध्ये जीवाची पर्वा न करता प्रतिबंधात्मक मोहिमेत सक्रिय असणाऱ्या आशा व गट प्रवर्तक शासनाच्या अनेक सुविधापासून वंचित आहेत. अनेक आशांच्या कुटुंबातील सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बेड व आॕक्सिजनसारख्या मूलभूत गरजादेखील मिळू शकल्या नाहीत.आरोग्य विभागातील इतर यंत्रणा व कंत्राटी कर्मचाऱ्यांपेक्षाही कमी मानधनावर प्रत्यक्षात काम  करणाऱ्या आशांना केवळ प्रतिदिन ३५ रूपये भत्यावर वेठबिगारीप्रमाणे काम करून घेतले जात आहे.
कोविड सेंटर,स्वॕब तपासणी,बाधित कुटुंबातील संपर्कातील सदस्यांची आरोग्य तपासणी तसेच लसीकरण केंद्रावर नियुक्ती देण्यात येत आहे. केलेल्या कामाचा कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात येत नाही. कामावरून कमी करण्याची धमकी देऊन आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी आशांना बिगर पगारी काम करण्यासाठी भाग पाडत आहेत.पन्नास लाख विमा लागू करून अंमलबजावणी करण्यात सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.या जीवन मरणाच्या मागण्या संघटनेने अनेक वेळा शासनाकडे केल्या असून सरकारच्यावतीने दुर्लक्ष होत असल्यामुळे दि.२४ मे २०२१ पासून जिल्ह्यातील,राज्यातील व देशातील सर्वच आशा व गट प्रवर्तक संपावर जाणार असल्याचे सीटू संलग्न लाल बावटा आशा वर्कर्स  व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने कळविण्यात आले आहे.