दर भिडले गगनाला; चिमटा बसतोय पोटाला! भडकलेल्या महागाईवर कोण ठेवणार अंकुश? गोरगरिबांना वाली कोण?
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच सामान्यांना महागाईचा वाढता टक्काही सतावताना दिसतोय. “लॉकडाऊन’मुळे निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेत अनेक रिटेल विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ केली असून, होलसेल माल मिळत नसल्याचे सांगत रिटेल विक्रेते मनमानी दर वाढवत आहेत. त्यामुळे जत शहरासह गावोगावच्या दरात तफावतही दिसत आहे.मोठ्या रिटेल विक्रेत्यांकडून माल खरेदी करून तो गावातील किराणा दुकानांमधून विकला जातो. रिटेल विक्रेते मूळ थोडीफार वाढ करून त्याची विक्री करीत असतात; मात्र सध्या लॉकडाऊन असून, शहरातून माल मिळत नाही. परिणामी, अनेक रिटेल दुकानदारांनी उपलब्ध माल जादा दराने विकण्याचा सपाटा लावला आहे. दरवाढीचा टक्काही वेगवेगळा आहे. काही गावात कमी तर काही गावात सरासरीपेक्षा जास्त किंमतीने मालाची विक्री केली जात आहे. मालाची उपलब्धता पाहून दर ठरविला जात आहे. या दरांवर सध्या कोणाचेच नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे.एखाद्या ग्राहकाने विक्रेत्याकडे दराबाबत तक्रार केल्यास मालच शिल्लक नसल्याचे सांगुन पाहिजे असल्यास याच दरात घ्या,नाहीतर दुसरीकडे जा, असे सुनावले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनाही नाइलाजास्तव जादा दराने त्याची खरेदी करावी लागत असल्याचे दिसते.होलसेल व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करून तो ग्रामीण भागात विकणाऱ्या रिटेल विक्रेत्यांनी मंदीत कमाईची संधी शोधली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे बाजारपेठा बंद आहेत. परिणामी, उपलब्ध असलेला किराणा माल चोरीछुपे जादा दराने विकला जातोय. ग्रामीण भागात ही परिस्थिती दिसून येत आहे.सध्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठांची गावे ओस पडली आहेत. शहरातील व्यापारीपेठांना कुलूप लागले आहे. धान्य, तेल, डाळ तसेच इतर वस्तुंचे होलसेल विक्रेतेही ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेत. परिणामी, होलसेल दरात वस्तूच मिळत नसल्याचे रिटेल विक्रेत्यांकडून नागरिकांना सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद