फोंडशिरस येथील ९ लाखांच्या चोरीचा गुन्हा उघड; नातेपुते पोलिसांची विशेष कामगिरी

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस

 फोंडशिरस येथील किशोर हणुमंत गोरे यांच्या राहत्या घरात तीन अज्ञात चोरट्यांनी जीन्याच्या दरवाजाचे कुलूप काढून घरामध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून त्यामधील ९ लाख, ४८ हजार, ६०० रुपये चोरून नेल्याची घटना १९ मार्च रोजी घडली होती.या घटनेचा आरोपीने कोणताही पुरावा ठेवलेला नसताना नातेपुते पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याची विशेष कामगिरी केली आहे.याबाबत नातेपुते पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी,या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरु, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूरचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असताना खोरोची येथील सचिन पोपट जाधव हा फोंडशिरस भागात वारंवार येऊन जात असल्याची माहिती मिळाली. तो काही कामधंदा करीत नसून पैशाची उधळपट्टी करीत असल्याने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. पोलिसी खाक्या दाखविताच फोंडशिरस येथील घरफोडी त्याने व तुषार दादासो चव्हाण-फोंडशिरस,सुरज फासगे-वडापुरी,मदन काळे-शेटफळ,कुमार कांबळे-वरकुटे,दादा बोडरे-मारकडवाडी, संदीप बोडरे-उंबरे दहिगाव या सर्वांनी केली असल्याचे कबूल केले.याबाबत अधिक तपासात फोंडशिरस येथून तुषार चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याची त्याने कबुली दिली.यानंतर या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन माळशिरस न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी ठोठावली आहे. या चोरीमध्ये आरोपींकडे चोरीस गेलेली २ लाख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली पल्सर व दोन स्प्लेंडर मोटरसायकली असे जप्त करण्यात आल्या आहेत.या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी नातेपुतेचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर,पोलीस हेड कॉ.अनिल गडदे,पोलीस नाईक मसाजी थोरात,नवनाथ माने,तुषार गाडे,पोलीस कॉ.अजित कडाळे,अमित जाधव,विश्वास जानकर,विशाल घाडगे,शाहू काळदाते तसेच सायबर शाखेचे पोलीस कॉ.अन्वर आत्तार यांनी केली आहे.