रुग्णवाहिकेच्या चालकांची अशीही माणुसकी!
वृद्धेवर स्वखर्चातून केले अंत्यसंस्कार!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत तालुक्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून जत शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट शहर बनले आहे.दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत असून 108 रुग्णवाहिका हे गोरगरीब जनतेसाठी रक्तवाहिनी बनली आहे.चालक योगेश बाबा मोटे,भिमराव बंडगर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून रूग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत.डॉ.राहुल पवार हे रुग्णांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात.कोरोनामुळे माणसातील माणुसकी हरवत चाललेली आहे.जन्म दिलेली मुलेही आपल्या आई-वडीलांपेक्षा आपला जीव कशा सुरक्षित राहील याकडे लक्ष देत आहेत.
रविवारी ह्रदय हेलवणारी घटना जत शहरात घडली.जत शहरातील एक वृद्ध महिला काही दिवसांपूर्वी आजारी होती.त्यांना जतच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण त्यांना त्रास होऊ लागल्याने पुढील उपचारासाठी सांगलीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.पण त्या वृद्ध महिलेसोबत बसण्यास कोणीच तयार न्हवते. पण आपल्या सौभाग्यवतीसाठी ‘तुझी साथ सोडणार नाही’, या उक्तीप्रमाणे चालताही न येणाऱ्या पतीने अखेर गाडीत बसण्याचा निर्णय घेतला.सांगलीजवळ गेल्यानंतर त्या वृद्ध महिलेचे निधन झाले.गाडीचालक योगेश बाबा मोटे व डॉ.राहुल पवार यांनी त्यांच्या मुलांमुलींना फोन करून सांगितले की, तुमच्या आईचे निधन झाले आहे.असे सांगण्यात आल्यानंतर “आम्ही काय करू? तुमचं तुम्ही तिकडं काय तर करा!” असे सांगण्यात आले. त्या वयोवृद्ध आजोबांनी “बाबा, पोरं नसली तर बरं झालं असतं, पण माझी परिस्थिती नसल्याने माझ्या पत्नीवर काहीही कर, पण तूच अंत्यसंस्कार कर!” असे सांगताच त्यांच्या डोळ्यात पाणी आले.चालक योगेश बाबा मोटे यांनी स्वखर्चाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.सदर घटनेची माहिती पत्रकार अमोल कुलकर्णी व निलेश माने यांनी दिली व “अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य घेऊन या, मी मृतदेह घेऊन येत आहे” असे सांगितले. त्यांच्या मदतीला अमित बिज्जरगी,माजी नगरसेवक महादेव कोळी,युवक नेते परशुराम मोरे,माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टीमु एडके, पत्रकार भागवत काटकर, पत्रकार हरीश शेटे,पत्रकार निलेश माने,प्रमोद ऐवळे व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जत येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. 108 रुग्णवाहिकेचे चालक योगेश बाबा मोटे व डॉ.राहुल पवार यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्या वृद्ध आजोबांनी अक्षरशः दोन्ही हात जोडत “तू माझ्यासाठी विठ्ठलरुपी देव आहेस” असे म्हणत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद