इस्लामपुरात उत्पादन शुल्क निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
इस्लामपूर येथील उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी आबा पाटील यास 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
परमिटरुम बियरबार चालकाचा परवाना नूतनीकरण करुन देण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने काल सांगली येथील अँटी करप्शन ब्युरो कार्यालयाकडे दिली होती.त्यानुसार पडताळणी केल्यानंतर पाटील याने तक्रारदार यांच्या परमिटरुम बियरबारचा परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर आज इस्लामपूर येथील उत्पादनशुल्क विभागात सापळा लावला. पाटील याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून पंधरा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असताना रंगेहात पकडण्यात आले. इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त राजेश बनसोडे,अप्पर पोलीस उपायुक्त  सुहास नाडगौडा,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सांगलीचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे,पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, अजित पाटील,संजय संकपाळ, भास्कर भोरे,रवींद्र धुमाळ, राधिका माने, सीमा माने यांनी ही कारवाई केली.
लाच मागणीसंबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,बदाम चौक,सांगली येथे किंवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233/2373095 किंवा हेल्पलाईन क्रमांक 1064 तसेच व्हाट्सअँप क्रमांक 7875333333 व मोबाईल क्रमांक 89 75 65 12 62 ,संकेतस्थळावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.