प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली,मिरज,कुपवाड शहर महानगरपालिकेचे उद्यान पर्यवेक्षक शिवप्रसाद अण्णासाहेब कोरे यास 75 हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
शासकीय कंत्राटदाराने सांगली महानगरपालिका कार्यालयाकडून केलेल्या कामाचे बिल तयार करण्यासाठी शिवप्रसाद कोरे याने त्यांच्याकडे बिलाच्या रकमेच्या पाच टक्के रक्कम लाच म्हणून मागितली असल्याबाबतची तक्रार काल सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली. त्यामध्ये लोकसेवक शिवप्रसाद कोरे यांनी कामाचे बिल तयार करण्याकरिता बिलाच्या पाच टक्के प्रमाणे 75 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.आज उद्यान विभाग, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका याठिकाणी सापळा लावण्यात आला. शिवप्रसाद कोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून 75 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असताना रंगेहाथ पकडण्यात आले.सांगली शहर पोलिस ठाण्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे,अप्पर पोलीस उप उपायुक्त सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे,पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे,पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले,पोलीस अंमलदार अविनाश सागर,सलीम मकानदार,संजय संकपाळ, भास्कर भोरे,संजय कलकुटगी,धनंजय खाडे,प्रीतम चौगुले,रवींद्र धुमाळ,राधिका माने,सीमा माने,विना जाधव,चालक बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
लाच मागणीसंबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उपअधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक,सांगली येथे किंवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233/2373095 किंवा हेल्पलाईन क्रमांक 1064 तसेच व्हाट्सअँप क्रमांक 7875333333 व मोबाईल क्रमांक 8975651262, संकेतस्थळावर संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या