वाळूचा लिलाव नडला ! नरवणे येथे दोघांचा खून

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दहिवडी:
नरवणे ता. माण येथे वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन सख्या चुलत भावांच्या दोन गटात बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास  झालेल्या मारामारीत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या खुनामुळे माण तालुका हादरला असून नरवणे येथे तणावाचे वातावरण आहे.
तहसीलदार बाई माने यांनी नरवणे येथे जप्त केलेल्या वाळूचा लिलाव 22 फेब्रुवारी रोजी केला होता. पाच ब्रास वाळूचे चंद्रकांत जाधव यांनी 33 हजार रुपये भरून लिलाव घेतला होता.दरम्यान विलास धोंडीबा जाधव यांनी तलाठ्याकडे तक्रार केली की चंद्रकांत नाथाजी जाधव हे बेकायदा वाळू उपसा करत आहेत.चंद्रकांत जाधव यांनी वाळू लिलाव घेतल्याचे सांगितले.त्यातूनच वाद वाढत गेला व आज सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांच्यात व त्यांचे चुलत भाऊ विलास धोंडीबा जाधव यांच्या गटामध्ये मारामारी झाली. यात अनेकजण जखमी झाले. जखमी झालेले चंद्रकांत नाथाजी जाधव,विलास धोंडीबा जाधव यांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
  मारामारीमध्ये अन्य जखमी झालेले सातारा येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे समजते.दोन्ही कुटुंबातील फिर्यादिंचे जबाब घेण्याचे काम व गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू आहे. डी वाय एस पी निलेश देशमुख व पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.