इस्टेट एजंटांना दुय्यम निबंधकांचा ग्रीन सिग्नल? अर्थपूर्ण तडजोडीची रंगली चर्चा !

जतमध्ये गुंठेवारीे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होणार?

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

काही कालावधीसाठी बंद करण्यात आलेले गुंठेवारी जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यासाठी येथील दुय्यम निबंधक यांनी इस्टेट एजंट यांना ग्रीन सिग्नल दिल्याने गुंठेवारी जमिन व प्लाॅटचे खरेदी व्यवहार सुरू होणार असल्याने इस्टेट एजंटामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर बंद पडलेले गुंठेवारी व्यवहार सुरू होण्यासाठी मोठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा जत तालुक्यात सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत शहरातील जत घाटगेवाडी रस्ता व शहरातील विविध भागात इस्टेट एजंटाकडून मोठ्या प्रमाणात गुंठेवारी जमिनीचे प्लाॅटींग करून त्याची विक्री सुरू आहे.
जत तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील अनेक इस्टेट एजंटानी येथील स्थानिक शेतकरी यांच्याकडून त्यांच्या शेतजमिनी विकत घेऊन त्यावर गुंठेवारी पद्धतीने प्लाॅटींग केले आहे. हे प्लाॅटींग करीत असताना त्यांनी शासनाच्या नियम व अटीचे पालन केले नाही. गुंठेवारी प्लाॅटमध्ये सरकारी नियमानुसार रस्ते, ओपनस्पेस तसेच बालवाडीसाठी व इतर उपक्रमासाठी जागा ठेवलेली नाही.तसेच नगररचना कार्यालयाकडून प्लाॅटींगसाठी मंजूरीही घेण्यात आली नाही.त्यामुळे हे प्लाॅटींग नियमबाह्य असे झाले असून जतचे उपविभागीय अधिकारी कार्यालयाने जतचे दुय्यम निबंधक यांना नियमबाह्य गुंठेवारी जमीन व प्लाॅटच्या नोंदणी न करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे दुय्यम निबंधक यानी एक आठवड्यांसाठी गुंठेवारी जमीन व प्लाॅटच्या नोंदणी बंद ठेवल्या होत्या.
जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारी जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी गुंठेवारी जमीन व प्लाॅटचे दस्तऐवज करताना गुंठेवारी प्लाॅट खरेदी घेणारे पक्षकार यांना जमीन म्हणूनच सदरची मिळकत खरेदी करावी लागत असल्याने त्यांची मोठी फसवणूक होत आहे.
गुंठेवारी प्लाॅट खरेदी करण्याच्या तयारीने आलेल्या पक्षकारांना त्यांच्या दस्तऐवजामध्ये जमीन म्हणूनच एक गुंठा,दोन गुंठे, तीन गुंठे असे क्षेत्र घालावे लागत असून चर्तुःसिमा लावून दस्ताची पूर्तता करण्यात येत आहे. परंतु गुंठेवारी प्लाॅट खरेदी घेणारे पक्षकार यांना त्यांच्या दस्तऐवजामध्ये प्लाॅट नंबर, प्लाॅटची मोजमापे, प्लाॅटचे एकूण क्षेत्रफळ तसेच प्लाॅटचा प्रमाणित नकाशा हे आवश्यक असतानाही ते दस्तऐवजामध्ये न आल्याने पक्षकारांची मोठी लुबाडणूक व फसवणूक होत आहे.
जत येथील आठवडाभर बंद असलेले गुंठेवारी जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होण्यासाठी येथील इस्टेट एजंट यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी मोठी आर्थिक तडजोड केल्यानेच हे व्यवहार सुरू होत आहेत,अशी चर्चा जत तालुक्यात सुरू आहे.