प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली:
सांगलीचे माजी आमदार संभाजीराव पवार यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले.गेल्या काही काळापासून त्यांना पार्किन्सनचा जुनाट आजार होता. मुंबई येथील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.परंतु कोरोनावर त्यावेळी त्यांनी यशस्वी मात केली होती.
बिजलीमल्ल म्हणून ओळख असणारे संभाजी पवार पानाला चुना लावेपर्यंत प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करत असत.महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, हरियाणा यासारख्या अनेक राज्यांमध्ये त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
स्व. वसंतरावदादा पाटील यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णूअण्णा पाटील यांचा त्यांनी विधानसभेला पराभव केला होता. तेव्हापासून त्यांना जायंट किलर म्हणून संबोधले जात होते.संभाजी पवार यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणापासून संन्यास घेतला होता.
शेतकरी, कामगार व कष्टकरी यांचे प्रश्न मांडून विधानसभा गाजवत होते.जनता दलाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले. 2009 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.
आज दुपारी 12 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. दुपारी एक वाजता मारुती मंदिराजवळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे व त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन