मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये ‘मराठी राजभाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज यांची जयंती’ उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कारंडे तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय लोंढे यांच्या शुभहस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी डाॅ.सुभाष कारंडे,डाॅ.जयंत कुलकर्णी यांच्या हस्ते मराठी विभागांतर्गत विद्यार्थ्यांचे विविध विषयांवरील लेखनसाहित्य ‘आविष्कार’ या भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डाॅ.विजय लोंढे होते. स्वागत डाॅ.संजय सपकाळ यांनी केले.
यावेळी मराठी राजभाषा गौरवदिनाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘निबंधलेखन’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.या स्पर्धांचे आयोजन प्रा.सौ. रेखा दुधकर, प्रा.सौ.स्वाती बाबर,प्रा.आबासाहेब जाधव यांनी केले होते.
मराठी भाषादिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा.विजय शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मराठी भाषा ही जागतिक पातळीवरील एक महत्त्वाची भाषा असून तिचे जगात चौदाव्या तर भारतात चवथ्या क्रमांकावर स्थान आहे.त्यामुळे मराठीचा लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे.
वेदपूर्वकाळ ते एकविसाव्या शतकातील मराठी अशा विविध कालखंडातील मराठी भाषचे स्वरुप,स्थित्यंतरे ,तिचे महत्व,सद्यस्थिती, आव्हाने अशा विविध घटकांवर त्यांनी मांडणी केली. आजच्या विज्ञान – तंत्रज्ञान,संगणक काळात मराठीने सर्व बाबतीत व्यापकपणे आपले अस्तित्व निर्माण केले आहे. रोजच्या बोलण्यामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर केल्यानेच तिचे सामर्थ्य आणखी वाढणार आहे. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा परिचय त्यांनी आपल्या भाषणातून केला.
कार्यक्रमाचे आभार प्रा.शहाजी पारसे यांनी केले. यावेळी प्रा.गणपतराव नांगरे,प्रा.मोहन हजारे, डाॅ.ऋतुजा कुलकर्णी,प्रा.सदाशिव मोरे,प्रा.दादासो काळे, डाॅ.धनंजय लोहार,प्रा.हणमंत सावंत, डाॅ.प्रवीण माने, प्रा.सौ.शकुंतला कुंभार, प्रा.प्रवीण व्हनखंडे, प्रा.दत्तात्रय टकले,दत्तात्रय बंडगर,बाळासो बनसोडे,जयश्री चव्हाण,कृष्णा खिलारी, गणेश लिंगे,राजू पवार तसेच प्राध्यापक,प्राध्यापिका,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.


संबंधित बातम्या
मराठी साहित्य मंडळाचा ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रमोद तरळ यांना जाहीर
माडगुळे येथे उद्या शिदोरी साहित्य संमेलन
चिंचणी यात्रेनिमित्त आटपाडी आगारातर्फे जादा बसगाड्यांचे बुकिंग सुरु