
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी २५ फेब्रुवारी हा ‘एक दिवस सैनिकांसाठी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितल्याप्रमाणे माळशिरस पंचायत समितीच्या सभागृहात अगदी खेळीमेळीत हा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्याशी निगडित प्रलंबित तक्रारी, समस्यांबाबत पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी अर्जुनसिह मोहिते-पाटील यांनी सैनिकांच्या प्रश्नाबाबत स्वतः विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना फ़ोन करून, तसेच तहसीलदार यांनाही फोन करून माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून माजी सैनिकांना कोणती कामे आवश्यक आहेत, त्याची मागणी करण्यासाठी सांगितले.
तसेच महसूल, महावितरण, भूसंपादनाविषयी निगडित समस्यांबाबत तहसीलदार कार्यालयात अर्जावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.
अर्जावर कारवाही करण्यास वेळ लागणार असेल तर किंवा दुसऱ्या दिवशी विभागाशी संबंधित असेल तर अर्जदाराला पोहोच देऊन कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे,अशी माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील , गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी आजी, माजी सैनिक, विधवा पत्नी यांच्याप्रति आदर सन्मान व्यक्त करून जिल्हा प्रशासन व आम्ही स्वतः तुमच्या सोबत आहोत,अशी भावना व्यक्त केली.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती शोभाताई साठे, पंचायत समिती सदस्य अजय सकट, तसेच त्रिदल सैनिक सेवा संघ (महाराष्ट्र) तालुका अध्यक्ष सुरेश गुलाबराव तोरसे,राजू गायकवाड, मारुती वाघमोडे , युवराज पिंगळे यासह माळशिरस तालुक्यातील आजी माजी सैनिक उपस्थित होते.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद