विट्यात ‘तंबाखूमुक्त शाळा’ याविषयी कार्यशाळा संपन्न

शिराज शिकलगार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /विटा:

महाराष्ट्रासह संपूर्ण जगात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत असून यात शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढत आहे. शहरी व ग्रामीण विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थांच्या जाळ्यात गुरफटून जात आहे. म्हणून महाराष्ट्रतील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्याची मोहीम सलाम मुंबई फाऊंडेशन व महाराष्ट्र शासन आणि सहाय्यक सेवा भावी संस्था यांच्या सहकार्याने राबवली जात आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग सांगली व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या नियंत्रणाखाली ‘चला बनवूया तंबाखूमुक्त शाळा’ सांगली जिल्हा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ स्तरावर हाती घेतली आहे. विटा हायस्कूल येथे खानापूर तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमधील प्रमुख, शिक्षक, केंद्रप्रमुख अशा प्रतिनिधींसाठी तंबाखूमुक्त शाळा अभियान या विषयावरती कार्यशाळा आयोजित केली होती.
गटशिक्षणाधिकारी श्रीमती अनुराधा म्हेत्रे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्या मार्गदर्शन करताना म्हणाल्या,खानापूर तालुक्‍यातील ज्या शाळा तंबाखूमुक्त म्हणून काही निकष पूर्ण केले नाहीत, त्यांनी ताबडतोब ते निकष पूर्ण करून घ्यायचे आहेत. हे राष्ट्रीय कार्य असून या कार्यात सर्वांनी सहभागी होऊन यशस्वी टप्पा पूर्ण करायचा आहे. खानापूर तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका होईल यासाठी प्रयत्नशील राहायचे आहे. तंबाखूचे व्यसन दिवसेंदिवस वाढत असून याला आळा घालण्यासाठी शालेय स्तरावरती प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते सर्व करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तंबाखू मुक्त शाळा अभियान सांगलीचे जिल्हा समन्वयक रवी कांबळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून
बोलताना म्हणाले, सर्व शाळांनी या मोहिमेत सहभाग घ्यायचा आहे. टोबॅको फ्री स्कूल एप्लीकेशनवर आवश्यक कागदपत्रासह नऊ निकषांद्वारे संबंधित कागदपत्रे अपलोड करून येणाऱ्या 8 दिवसांमध्येच सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर तंबाखूमुक्त शाळा घोषित करायच्या आहेत.
पाटील यांनी यावेळी नऊ निकष कोणते व ते कसे पूर्ण करायचे याची सविस्तर माहिती दिली आणि कागदपत्रे कशी अपलोड करायची या तांत्रिक बाबीची माहिती सांगितली. पुढे ते म्हणाले की, सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनीही या मोहिमेला गती देण्यासाठी सर्व शाळांना या मोहिमेत गांभीर्याने सहभागी होण्याच्या सूचना पत्र काढून केली आहे.
यावेळेला राष्ट्रपिता म. गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. बाळासाहेब कर्पे म्हणाले की, शाळा, महाविदयालये, शिक्षक, मुख्याध्यापक आणि समाजातील समाज कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, डॉक्टर यांच्या मदतीने समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत व्यसनमुक्ती, मध्यपान विरोधी व तंबाखू मुक्त अभियान पोहोचण्यासाठी आपण यशस्वी प्रयत्न करूया. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने लवकरच सर्व भारत 100% तंबाखूमुक्त व व्यसनमुक्त होईल अशी खात्री आहे. प्रास्ताविक विषयतज्ञ नवनाथ कदम यांनी केले. आभार केंद्रप्रमुख दिलीप निकम यांनी मानले. यावेळी विषयतज्ञ राजेंद्र जंगम,विटा हायस्कुलचे मुख्याध्यापक महाडिक यांच्यासह प्राध्यापक,मुख्याधापक,केंद्रप्रमुख,शिक्षक, समग्र स्टाफ उपस्थित होता.