अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:
जत तालुक्यातील उटगी येथील कळ्ळी वस्तीवर राहणाऱ्या रेवप्पा रायप्पा मेटगार यांच्या राहत्या पत्रावजा घराला बुधवारी आग लागली व अख्खे कुटूंब रस्त्यावर आले. या घटनेची माहिती मिळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेची टीम तात्काळ तेथे पोहचली व त्यांना धीर दिला. गुरुवारी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत मेटगार कुटूंबियांना रोख पाच हजार रुपये, भांडी आदी साहित्य देण्यात आले. अडचणीच्या व संकटाच्या काळात मानव मित्र संघटना मदतीला धावून आल्याने मेटगार कुटूंबियांना अश्रू अनावर झाले होते.
जत तालुक्यातील उटगी येथील कळ्ळीवस्ती येथे रेवप्पा रायप्पा मेटगार यांच्या राहत्या पत्रा वजा छप्पराच्या घरास आग लागून संसारोपयोगी साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे. रेवप्पा रायप्पा मेटगार यांच्या मालकीच्या घरास बुधवारी दुपारी तीन वाजता आग लागली. रेवप्पा यांची नात चुलीवर स्वयंपाक करत असताना चुलीतील निखाऱ्याने पेट घेऊन गवती छप्पर असलेल्या घराने पेट घेतला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.शेजारच्या नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण यश आले नाही.
आगीमुळे घरातील संसारोपयोगी साहित्य ,अन्यधान्य ,एक तोळा सोने, रोख रक्कम असे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.घटनेची माहिती मिळताच गावकामगार तलाठी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात आला. यावेळी मंडळ अधिकारी टी. एस. तळपे, तलाठी नितीन कुंभार ,धानाप्पा कोळी ,अल्लाबक्ष मुल्ला उपस्थित होते. मजुरीचे काम करून पोट भरून घेणाऱ्या मेटगार कुटुंबियांचे राहत्या साध्या घराला आगीने गिळंकृत केल्याने कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. घटनेची माहिती मिळताच जत पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिराजदार यांनी घटनास्थळी भेट घेऊन आर्थिक मदत करून कुटुंबियांचे सांत्वन केले.तसेच आगामी काळात सदर कुटुंबियांना घरकुलाचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले आहे . माजी सरपंच भिमाण्णा बिराजदार यांनीही आर्थिक मदत करत मदतीचा हात दिला आहे.यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य परप्पा गडदे, चिदानंद तेली,दशरथ कोळी उपस्थित होते .
मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या रेवप्पा मेटगार यांना माजी उपसरपंच चंद्रकांत डोळ्ळी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी आर्थिक मदत दिली.
मानव मित्र आहे मदतीला
जत तालुक्यात घर जळाले व अन्य काही घटना घडल्या की श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्यावतीने तात्काळ मदत देण्यात येते. एखाद्याचे घर जळाले तर त्याला तात्काळ पाच हजार रुपये मदत दिली जाते. या महिन्यापासून मानव मित्र संघटनेकडून पाच हजार रुपये मदत तर केलीच, त्याचबरोबर संघटनेचे सदस्य सिद्राय्या मोरे, बिराप्पा मोरे यांनी घर जळालेल्या कुटूंबियास भांडे द्यावेत अशी संकल्पना मांडली व त्यांच्या वतीने भांडेही दिले.
उटगी येथील घटना कळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य घटनास्थळी पोहचले व त्यांनी कुटूंबियांना धीर देत या घटनेची माहिती तुकाराम बाबा यांना सांगितली. गुरुवारी तुकाराम बाबा हे स्वतः उटगी येथे आले व त्यांनी मेटगार कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्यावतीने रोख रक्कम व भांडे कुटूंबियांना देण्यात आले. यावेळी माजी मुख्याध्यापक एम. एस. पाटील ,माजी उपसरपंच चंद्रकांत डोळळी , महांतेश पाटील ,ग्रामसेवक वाय.डी.चिगदुळे, सिद्राय्या मोरे, बिराप्पा मोरे उपस्थित होते.
ग्रामपंचायतीने घ्यावा मदतीसाठी पुढाकार- बाबा
एखाद्याचे घर जळाले तर आपल्या गावातील अख्खे कुटूंब उघड्यावर पडते. या कुटूंबियांना मदतीची खूप गरज असते. श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना शक्य होईल तितकी मदत करते,पण अशावेळी गावातील दानशूर व्यक्तींनी, ग्रामपंचायतीनी पुढाकार घ्यावा असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद