शेतजमिनीचे पंचनामे केले पशुधन शेळ्या-मेंढ्यांचे पंचनामे कधी करणार!-मेंढपाळ आर्मी

मेंढपाळ आर्मी आक्रमक;

महाराष्ट्रातील शेळ्या-मेंढ्या पशुधनाचा सर्वे करा: महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या साठीच महामंडळ निधीविना पोरकं ठेवू नका

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कवठमहांकाळ,आटपाडी:
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास प्रक्षेत्र रांजणी ता.कवठेमहांकाळ या ठिकाणी मेंढपाळ आर्मीच्या संयोजकांनी मेंढपाळांच्या विविध मागण्यांवर प्रक्षेत्र व्यवस्थापक यांना निवेदन दिले.
निवेदनात असे म्हटले आहे कि,महाराष्ट्रातील मेंढपाळ वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जातोय, देशाला सर्वाधिक पशुधन महाराष्ट्रातील मेंढपाळ पुरवतो. परंतू त्याच महाराष्ट्रातील मेंढपाळांची ससेहोलपट दिवसेंदिवस वाढत चालली आहे.त्यांच्यावर दिवसाढवळ्या अन्याय,अत्याचार,हल्ले होताहेत. त्यांच्यासाठी असणारं शेळी मेंढी विकास महामंडळ निधीविना पोरकं ठेवण्यात आले आहे.
साधारणतः बेचाळीस वर्ष या महामंडळाच्या स्थापनेला झाली. परंतु मेंढपाळांना या महामंडळाचा काहीही फायदा झालेला नाही.या महामंडळाचे अर्थिक विकास महामंडळ करायला हवं होतं, परंतू त्यावर आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी कधीही आवाज उठवला नाही.महामंडळामध्ये स्टाफ पुर्णतः कमी आहे. महामंडळाच्या एकुण ९ शाखा कार्यान्वित आहेत. परंतु एकाही शाखेमध्ये प्रक्षेत्रातील मेंढपाळांची व शेळ्या मेंढ्याची संख्या किती आहे याची नोंद नाही.
महाराष्ट्रातील मेंढपाळ हा निमभटकं जीवन जगतो, तर महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील मेंढपाळ वर्षभर भटकंती करतो.
मेंढपाळ आर्मीचे संयोजक अर्जुन थोरात बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील मेंढपाळांचा त्वरित सर्वे करून शेळ्या मेंढ्यांची संख्या जाहीर करण्यात यावी. शेतजमिनीचे पंचनामे केले,पशुधनाचे केव्हा करणार? पशुधन शेळ्या मेंढ्यांची आवश्यकता सरकारला नाही का? असा प्रश्न थोरात यांनी बोलताना उपस्थित केला. यावेळी बोलताना मेंढपाळ आर्मीचे अंकुश मुढे म्हणाले, महाराष्ट्रातील मेंढपाळांना सुरक्षा कवच महामंडळाकडून देण्यात यावे. “जर महामंडळ म्हणजे ओसाड गावची पाटीलकी” असेल तर येत्या काळात महामंडळालाही टाळे ठोकु.मेंढपाळांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरू असेही मुढे यावेळी म्हणाले.
निवेदनात वेगवेगळ्या ११ मागण्या महामंडळाच्या प्रशासकीय व्यवस्थापक यांच्या पुढे मांडल्या.त्यांनी महामंडळाच्या मुख्य अधिकारी यांच्याकडे पाठविणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी मेंढपाळ आर्मीचे मार्गदर्शक अधिकराव हजारे, प्रवक्ते राहुल हजारे, लक्ष्मण तात्या कांबळे, मेंढपाळ आर्मीचे स्टार प्रचारक विनायकराव थोरात, चंद्रकांत हुलगे आदि मेंढपाळ आर्मीचे संयोजक उपस्थित होते.