आरोग्यदायी मानवतेला सेवाभावानेे सलाम! आटपाडी येथे ॲड.व्ही.बी.पाटील कुटुंबाचा उपक्रम

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी ग्रामीण रुग्णालयात व तालुका आरोग्य विभागात निस्सीम सेवाभावाने कार्यरत असलेल्या परिचारिका सौ.माया संदीप माने-दळवी यांनी आटपाडी येथील ॲड.व्ही.बी.पाटील कुटुंबाला कोविड प्रादुर्भावाच्या काळात दाखविलेल्या आरोग्यदायी मानवतेला या कुटुंबाने सेवाभावाने सलाम केला आहे.
आटपाडी ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागाअंतर्गत सौ.माया संदीप माने-दळवी या परिचारिका गेल्या आठ वर्षापासून कार्यरत आहेत.या कालखंडामध्ये त्यांनी आपली सेवा अतिशय चोख व प्रामाणिकपणे बजावली आहे.त्यांच्या या आरोग्यदायी मानवतेची प्रचिती आटपाडी तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड.विलासराव पाटील व सौ.पूजा विलासराव पाटील यांच्या कुटुंबाला आली.
मार्चपासून covid-19 प्रादुर्भावाच्या कालखंडाने सर्व व्यवस्था हतबल झाली असताना आरोग्य विभागातील काही ‘देव’ माणसांनी प्रादुर्भावित लोकांना जगण्याचा आधार निर्माण केला व बळ दिले.अॅड. पाटील यांनाही प्रादुर्भाव झाला असताना त्यांच्या कुटुंबियांना आधार व बळ देण्याचे काम या ‘देवदूत’ परिचारिकेने केले. त्यांची चाचणी घेऊन त्यांना सुयोग्य उपचार करीत चोखपणे सेवा बजावली.कोरोना महामारीच्या काळात गेल्या सात महिन्यांपासून शासकीय तंत्रनिकेतन आटपाडी येथे रुग्णांची सेवा करीत असताना आत्तापर्यंत अंदाजे 875 कोरोनाबाधित रुग्णांवर औषध उपचार करून त्या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
आरोग्य विभागातील अशा प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या भगिनीचा सत्कार आटपाडी तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विलासराव पाटील व सौ.पूजा विलासराव पाटील यांच्या कुटुंबाने केला. त्यांनी पुरवलेल्या आरोग्यदायी सेवाभावाला स्नेहभोजन व सत्काराने सलाम करून सामाजिक बांधिलकी जपली व त्यांच्या सेवावृत्तीला सलाम केला. तसेच त्यांच्या भविष्यकालीन शुभसेवेस शुभेच्छा दिल्या.