माळशिरसमध्ये धनगर आरक्षण,प्रश्नी आरक्षण कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन

संजय हुलगे 
माळशिरस/ प्रतिनिधी: 

महाराष्ट्रातील धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज माळशिरसचे नायब तहसीलदार तुषार देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
धनगर समाजाची आर्थिक, राजकीय,शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती अत्यंत हलाखीची व बिकट झालेली आहे. यामधून धनगर समाजाची उन्नती होण्यासाठी यापूर्वीच महाराष्ट्राच्या यादीत धनगर समाजाचा ST च्या यादीत 36 व्या अनुक्रमांकावर समावेश आहे.तथापि धनगर ऐवजी धनगड असा उल्लेख झाल्यामुळे समाजाला आरक्षणाचे फायदे मिळू शकत नाहीत. ही दुरुस्ती होणेसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राच्या आदिवासीच्या यादीमध्ये अनुक्रमांक 36 वर धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती केंद्र शासनाने करणेबाबतची शिफारस करण्यात यावी.  केंद्र सरकारने या दुरुस्तीचे बिल तयार करून संसदेमध्ये मंजूर करण्यात यावे किंवा संसदेत सादर झालेल्या 325 क्रमांकाच्या बिलामध्ये ही दुरुस्ती टाकून बिल मंजूर करावे किंवा या दुरुस्ती बाबतचा राष्ट्रपती यांचे मान्यतेने आध्यादेश त्वरित काढण्यात यावा अशी मागणी तमाम धनगर समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.
हे निवेदन शिफारशीसह मुख्यमंत्री यांना सादर करावे अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने माळशिरसचे नायब तहसीलदार तुषार देशमुख यांना देण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य अॅड.आकाश पाटील,अॅड.दादासाहेब पांढरे-पाटील,अॅड.सिताराम झंजे,अॅड.धनंजय सर्जे,अॅड.महादेव माने,नवनाथ तांबवे हजर होते.