धनगर आरक्षणप्रश्नी जतमध्ये आज लक्षवेधी आंदोलन होणार

अनिल मदने
जत /प्रतिनिधी :

धनगर समाजाच्या अनुसुचित जमाती आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत येथे आज 7 सप्टेंबर 2020 रोजी लक्षवेधी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली.
राज्यातील ठाकरे सरकार सत्तेवर येत असताना धनगर आरक्षणासंबंधीची ग्वाही देण्यात आली. तत्पुर्वी या सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आवाज उठवला आहे, मात्र सत्तेवर आल्यानंतर अनुषंगिक कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही व्हावी,यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे.राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर जत तहसिल कार्यालसाबाहेर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सामाजिक आंतराचे सर्व नियम पाळून हे आंदोलन होणार असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.
आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने मंत्री समिती स्थापन करावी, तसेच राज्य आणि केंद्र शासनाशी समन्वय करणारी लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची समन्वय समिती गठित करावी. केंद्र शासनानेही अशीच स्वतंत्र समिती स्थापन करावी,अशी आमची मागणी आहे. त्यादृष्टीकोनातून राज्य सरकारनेही पाठपुरावा करावा, या मागण्या ढोणे यांनी केल्या आहेत.