
मुख्तार मणियार/औसा,प्रतिनिधी:
लातूर जिल्हा अल्पसंख्याक नेत्यांनी वंचित.
लातूर जिल्ह्यातील प्रख्यात कायदेपंडित तथा औशाचे माजी नगराध्यक्ष अॅड. मुजीबोद्दीन पटेल यांचे लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.मृत्यूसमयी ते 81 वर्षांचे होते.
अॅड. मुजीबोद्दीन पटेल यांनी 1964 मध्ये वकिली आणि सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. राजकारण व समाजकारण करत आयुष्यभर औसा शहराच्या राजकीय,सामाजिक आणि धार्मिक क्षितिजावर ते प्रकाशित राहिले.काँग्रेसच्या सत्तेत असताना त्यांना महाराष्ट्र राज्य हज कमिटी, मराठवाडा वक्फ बोर्डाचे सदस्यही म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.वकीली व्यवसायात आपली पकड निर्माण केली होती. त्यांनी औसा येथील आपल्या साथीदारांच्या मदतीने फखरुद्दीन अली अहमद एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने हजरत सूरत शाह उर्दू प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेची पायाभरणी करुन उर्दू शिक्षणाचे आयोजन केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेसच्या विविध पदांवर तसेच अन्य राजकीय पदावरही काम केले होते. औसा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत दोनदा अत्यंत कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. लातूर जिल्ह्यात आणि विशेषत: औसा शहरात शांतता व सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.आजपर्यंत टिकून राहणारी उत्कृष्ट रणनीती त्यांनी स्वीकारली होती.
आपल्या संयम व अत्यंत नम्र आणि आदरातिथ्य स्वभावामुळे परिचित होते.सर्वांशी हसत खेळत मन मिळावू स्वभाव हीच निती त्यांना भोवली व शहराचे 15 वर्षे नगराध्यक्ष म्हणून ओळख निर्माण झाली. ते सध्याच्या परिस्थितीवर सामाजिक, राजकीय चर्चा करत होते. शहराच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी व नगरपालिकेच्या उत्पन्नाचे कायमस्वरूपी स्त्रोत वाढविण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार केल्या. काँग्रेस राजकारणातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते.जनहितार्थ, शहरातील रस्ते, पथदिव्यांची कामे त्यांच्या कालावधीत झाली होती. त्यामुळे लोकांमध्ये लोकप्रियता वाढली.
दिवंगत अॅड. मुजीबोद्दीन पटेल यांच्या पश्चात पत्नी , 7 मुले आणि विवाहित 3 मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद