जत प्रांताधिकारी कार्यालयामध्ये अव्वल कारकून २० हजाराची लाच घेताना ताब्यात; लाचलुचपत विभागाची कारवाई

अनिल मदने
जत/ प्रतिनिधी:

जत प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून श्रीकांत कृष्णा चंदनशिवे (वय ४६ रा. आंबेडकरनगर, कवठेमहंकाळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी चंदनशिवे याच्या विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ३१.०८.२०२० रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये चंदनशिवे, अव्वल कारकून याने तक्रारदार यांच्याकडे प्रथम २५००० रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती २०,००० रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम घेवून येण्यास सांगितलेचे निष्पन्न झाले. त्यानंतर लागलीच उपविभागीय अधिकारी, उपविभाग जत कार्यालय या ठिकाणी सापळा लावला असता श्रीकांत कृष्णा चंदनशिवे याने तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून २०,००० रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याअनुषंगाने श्रीकांत चंदनशिवे याचेविरुध्द जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे व अपर पोलीस उप आयुक्त श्रीमती सुषमा चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सुजय घाटगे, पोलीस उप अधीक्षक, गुरूदत्त मोरे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी अविनाश सागर, सुहेल मुल्ला, संजय संकपाळ, सलिम मकानदार, धनंजय खाडे, सिमा माने, वीणा जाधव, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.