
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे आयोजित श्रीमंत बाबासाहेब देशमुख व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ‘माणसासमोरील मोठी आव्हाने’ या विषयावर त्यांनी विनोदी, मिश्किल,रसाळ आणि अभ्यासपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित मान्यवरांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कै.श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. संदीप विभुते यांनी केले. यावेळी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व ,निबंध व रांगोळी स्पर्धांमध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा,विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व सैन्य दलामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विचारमंचावर डॉ. सदाशिव मोरे, डॉ. शिवाजी विभुते व आबासाहेब जाधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डाॅ.विजय लोंढे,प्रा. जे.आर. चव्हाण व प्रा. गोविंद काळे यांची विशेष उपस्थिती होती.
कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे विज्ञान शाखेतील प्रतिष्ठित संशोधक असूनही कला, साहित्य, संस्कृती, समाजशास्त्र अशा विविध क्षेत्रांवर समान अधिकाराने भाष्य करणारे अभ्यासक आहेत. त्यांनी सुरुवातीलाच संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा भावार्थ सांगत मानवजातीच्या जगण्याची तत्वज्ञाननिष्ठ व्याख्या उलगडून सांगितली. यानंतर त्यांनी अश्मयुगापासून ते आधुनिक काळात मानवसमाजात झालेले बदल, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांची उत्क्रांती, आणि आजच्या जागतिक आव्हानांपर्यंतचा अतिशय व्यापक पट मांडला. “ज्ञानातून विज्ञान, विज्ञानातून तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानातून मानवी प्रगती घडली,” असे सांगत अनेक संशोधनांची व ऐतिहासिक घटनांची उदाहरणे त्यांनी उपस्थितांसमोर ठेवली.
समाज रचना, वर्गविभाजन, बहुजन समाजाला खुली झालेली शिक्षणद्वारे प्रगती, आणि ग्रामीण-शहरी मानसिकतेतील बदल यावर त्यांनी सखोल भाष्य केले. गावाकडील शेती, वाढत्या अपेक्षा, भौतिक सुखाच्या मागे धावणारा मनुष्य, आणि अहंकारामुळे निर्माण होणारे मानसिक ताणतणाव याचीही त्यांनी वास्तवदर्शी मांडणी केली.
स्त्रियांची ऐतिहासिक उपेक्षा, येशूपूर्व काळापासूनचा लिंगभेद, आणि आज महिलांनी स्वीकारलेल्या नेतृत्वभूमिकांविषयी बोलताना त्यांनी अनेक साहित्यिक व तत्त्वज्ञानपर संदर्भ दिले. “मानवजातीला पहिले ज्ञान हे महिलांकडूनच मिळाले,” या विधानाने सभागृहात विचारप्रवर्तक शांतता पसरली.
भारताची लोकशाही, वाढत्या जागतिक प्रतिष्ठा, जीडीपी आणि “सुखाचा जीडीपी” यांचा आगळावेगळा दृष्टिकोन, लोकसंख्या स्थैर्य, तसेच पाश्चात्य समाजासमोरील नव्या समस्या यांचा त्यांनी तुलनात्मक आढावा घेतला.
भविष्यातील भारताच्या संकल्पनेवर बोलताना ते म्हणाले, सन २०४७ मध्ये आपली लोकशाही शंभर वर्षे पूर्ण करणार आहे. विकसित भारत ही केवळ घोषणा नाही; ती प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नांची संकल्पना आहे.”
तंत्रज्ञानाचा योग्य वापर, अतिरेक टाळण्याची गरज, शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास, शिक्षक व विद्यार्थी यांनी संस्थेबद्दल बाळगावी लागणारी कृतज्ञता, आणि बदलत्या आरोग्यसंकटांचे गांभीर्य यासंबंधीही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा शेवट करताना त्यांनी चाणक्य, ग.दि. माडगूळकर, संत तुकडोजी महाराज अशा विभूतींची उदाहरणे देत मूल्याधिष्ठित जीवनाची गरज अधोरेखित केली. त्यांच्या प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि विचारांना चालना देणाऱ्या या व्याख्यानाने उपस्थित विद्यार्थी-शिक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यामुळे ही व्याख्यानमाला आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या समृद्ध परंपरेला आणि ज्ञानसमृद्धीला अधोरेखित करणारी ठरली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ.शिवाजीराव भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. शिवाजी विभुते यांनी व्यक्त केले. तसेच सूत्रसंचालन प्रा. विजय शिंदे यांनी केले.यावेळी संयोजन समिती मधील सर्व सदस्य,महाविद्यालयातील प्राध्यापक ,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती