
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
‘महाराष्ट्र ही संतांची पुण्यभूमी असून ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी परंपरेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना भक्तीचा व अभिव्यक्तीचा हक्क दिला,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांनी केले. दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित २१ व्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते ‘संत आणि विवेकवाद’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांच्या व्याख्यानाने सभागृहात चिंतनशील वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य,डाॅ.शिवाजीराव भोसले होते. यावेळी विचारमंचावर डाॅ.सदाशिव मोरे,प्रा.मोहन हजारे,प्रा.संताजी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. सदाशिव मोरे यांनी करून दिला.
डॉ. मिरजकर पुढे म्हणाले की संत ज्ञानेश्वरांची ‘ज्ञानेश्वरी’ ही मराठीतील सर्वांत प्रभावी आणि जनमानसाला स्पर्श करणारी ग्रंथपरंपरा आहे. भगवद्गीतेतील श्रीकृष्णाचा अर्जुनाला दिलेला उपदेश ज्ञानेश्वरांनी लोकभाषेत उतरवून सर्वांना समजेल अशा पद्धतीने 'देशीकार लेणे' रूपात साकारला. महाभारत, गीता आणि ज्ञानेश्वरी या त्रिसूत्रीची सांगड त्यांनी नेमकेपणाने घातली. संतांनी मांडलेला विवेकवाद, विवेक बुद्धीगम्य,विवेकवर्धी , नीर- क्षीर विवेक याविषयी त्यांनी सोदाहरण सखोल विवेचन केले. “विवेकवाद हा बुद्धीपुरता नसतो; तो अनुभवाचा व अंतःकरणाचा मार्ग आहे,” असे सांगत त्यांनी आजच्या समाजातील अंधश्रद्धा, ढोंगी साधुसंत आणि विज्ञानवाद–विवेकवादातील गल्लत यावर परखडपणे प्रकाश टाकला.
संतांनी तत्कालीन वर्णव्यवस्था, आश्रमव्यवस्था, सामाजिक बंधने यांना तोंड देत केलेल्या संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला. “संत होणे हा केवळ अध्यात्माचा विषय नाही; तो परोपकार, व्यापकता आणि कठोर वैचारिक शिस्त यांचा परिणाम आहे,” असे सांगत त्यांनी संत तुकारामांच्या गाथा बुडवणीसह संतांना भोगावे लागलेले प्रसंग समोर आणले. वारकरी संप्रदायातील विठ्ठल हा निशस्त्र देव असून “शब्द हीच शस्त्रे” असतात, या विचाराची त्यांनी सुंदर मांडणी केली. मनातील अहंकार, पाप, वाईट विचार कमी करण्यासाठी पश्चात्ताप आणि आत्मविश्लेषणाची गरज त्यांनी अधोरेखित केली. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा अर्थ सांगताना “अहंकाररहित मन आणि परोपकाराने ओथंबलेला स्वभाव हाच संतांचा खरा वारसा आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘ दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीने ज्ञानाच्या वाटचालीत घडवलेली परंपरा ही माणसाला विचार देणारी आहे. व्याख्यानमालेमुळे विद्यार्थी व शिक्षकवर्गाच्या वैचारिक क्षितिजाचा विस्तार होतो, आणि संतपरंपरेची मूल्ये अधिक दृढ होतात.’
कार्यक्रमाचे आभार प्रा. संताजी लोखंडे यांनी व्यक्त केले.तसेच सूत्रसंचालन प्रा. संजय बाबर यांनी केले. या विशेष व्याख्यानासाठी प्रा. दिनेश भिंगे, प्रा.जालिंदर चव्हाण, प्रा.गोविंद काळे, प्रा. चंद्रकांत हुलगे, प्रा. बालाजी वाघमोडे ,डॉ. सुप्रिया कदम तसेच संयोजन समिती मधील सर्व सदस्य,महाविद्यालयातील प्राध्यापक ,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती