कोसारीत युवकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

सुभाष हाक्के
कोसारी /प्रतिनिधी:

जत तालुक्यातील कोसारी येथील एका युवकाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची जत पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.
सचिन तुकाराम कोळी वय- 34,रा. कोसारी असे आत्महत्याग्रस्त व्यक्तीचे नाव आहे.गेल्या दोन-तीन वर्षापुर्वी तो युवक मुंबईहून गावाला आल्यानंतर मजुरी करून आपले जीवन जगत होता. पत्नी, दोन लहान मुले,आईसह दोन भाऊ असा त्याचा परिवार आहे.
शुक्रवार रात्री 8:30 ते 9:00 वाजण्याच्या दरम्यान हा इसम घरातून बाहेर पडला होता. त्याबाबत जत पोलीस ठाण्यांमध्ये हरवलेली केस दाखल केली होती. याबाबतचा तपास जत पोलीस करीत होते. कोसारी-कुंभारी रस्त्यावरील मोरेवस्तीजवळपासच्या विहिरीत शनिवारी कॅमेरा मशीनद्वारे तपासणी केली होती.तो तपास निष्क्रीय ठरला.
रविवारी सकाळी त्या व्यक्तीचा मृतदेह त्याच विहीरीत सापडला. जत पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह बाहेर काढला व घटनेचा पंचनामा केला.त्यानंतर शवविच्छेदन करून कोसारी येथे त्याच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात आला. कोसारी,कुंभारी गावात या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास जत पोलिस करीत असल्याची माहिती उपसरपंच बाळासाहेब पवार यांनी दिली.