


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी
टेंभूच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या आटपाडी तालुक्यातील १२ गावच्या मंजूर पाणी योजनेच्या पूर्ततेसाठी तातडीने घेतल्या जाणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा अधिवेशन काळात मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा श्रमिक मुक्ती दल पाणी संघर्ष चळवळीचे प्रणेते डॉ.भारत पाटणकर आणि आनंदरावबापू पाटील यांनी केली .
गुळेवाडी, विभूतवाडी, धावडवाडी, (२७८४ हेक्टर सिंचन क्षेत्र ) राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी ( दिघंची ), पांढरेवाडी ( दिघंची ), उंबरगांव, पिंपरीखुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, ( ७२६० हेक्टर सिंचन क्षेत्र ) आणि वलवण ( ९८३ हेक्टर सिंचन क्षेत्र ) या बारा वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश आहेच. तातडीने यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देवून इतर सोपस्कर पार पाडावे अशी आमची आजच्या परिषदेतली मुख्य मागणी आहे .
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी विधानसभेच्या होणाऱ्या अधिवेशनात या योजनेसाठी सत्वर निधीची तरतूद व्हावी, टेंडर काढून पुढील सोपस्कर पार पाडले जावेत, यासाठी अधिवेशन दरम्यान मुंबईतल्या आझाद मैदानावर या वंचित १२ गावच्या शेकडो शेतकऱ्यांसमवेत आटपाडी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा डॉ.भारत पाटणकर – आनंदराव बापू पाटील यांनी केली. उपस्थित शेकडोंनी हात उंचावून यास उस्फूर्त पाठींबा दर्शविला .
राजेवाडी तलावात जिहे कटापूर योजनेतून आणले जाणारे पाणी हे नदीच्या पूराचे आहे, तेही आठमाही आहे. राजेवाडीत या योजनेतून येणारे पाणी फक्त माण, खटाव तालुक्यातील गावांसाठी राखीव आहे . हे राजेवाडीत पाणी साठवण एरियात येईपर्यंत आणखी अनेक वर्षे लागतील . या पाण्याच्या मृगजळापाठीमागे धावण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबाला ५००० घनमीटर पाणी ते त्यांच्या बांधापर्यंत बंदिस्त पाईपलाईनने खात्रीने देवू शकणाऱ्या टेंभू योजनेतील शाश्वत पाण्याच्या या वंचित १२ गावांना मंजूर असणाऱ्या आणि अगदी उशा- पायशापर्यत आलेल्या पाणी योजनेसाठी फक्त निधीच्या तरतुदीची आवश्यकता आहे. त्यासाठी राजेवाडी, लिंगीवरे वगैरे वंचित १२ गावच्या शेतकऱ्यांनी मोठा लढा संघर्ष उभा केला पाहिजे. पाणी संघर्ष चळवळ या लढ्याचे नेतृत्व करणार असल्याने या लढ्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मुंबईला जायचा निर्धार आणि नियोजन करावे असे आवाहन डॉ.भारत पाटणकर – आनंदरावबापू पाटील यांनी केले.
पाणी चळवळीच्या लढ्याचा पूर्व इतिहास मांडताना सादिक खाटीक व त्यांच्या सहकारी पत्रकार मित्रांनी आयोजित पाणी परिसंवादाच्या कार्यक्रमातूनच या चळवळीचे रणशिंग फुंकल्याचे आणि गत ३१ वर्षात केलेल्या प्रत्येक घडामोडींचा डॉ.भारत पाटणकर – आनंदरावबापू पाटील यांनी परामर्श घेतला. टेंभू योजनेची फलश्रूती ही या चळवळीचीच देण असल्याचेही पाटणकर – पाटील या मान्यवरांनी सप्रमाण दाखवून दिले .
श्री. धुळाजीराव झिंबल विद्यालय,लिंगीवरेच्या मैदानावर झालेल्या या परिषदेत प्रारंभी माजी जि.प. सदस्य जनार्धन झिंबल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हणमंतराव देशमुख, माजी उपसभापती साहेबराव चवरे, मनोहर विभूते, राजेवाडीचे नेते बाळासाहेब पाटील – शिरकांडे, माजी गट शिक्षणाधिकारी हणमंतराव गुरव, राजेवाडीचे सरपंच प्रशांत शिरकांडे, पिंपरी खुर्दचे माणिकराव कदम, विभूतवाडीचे माजी सरपंच नंदकुमार इनामदार, इत्यादींची जोरदार भाषणे झाली.
आटपाडी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह पाटील, राष्ट्रवादी ओबीसीचे सांगली जिल्हाध्यक्ष जालींदर कटरे,श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल, माजी सरपंच आगतराव खांडेकर, अशोक खटके, निंबवडेचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील, तडवळेचे माजी सरपंच जितेंद्र गिड्डे, माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब मरगळे, शंकरराव गिड्डे तडवळे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ता यमगर बनपूरी, महादेवदाजी देशमुख शेटफळे, नाथा बाड विठलापूर, भिमाशंकर स्वामी, किरण लोहकरे, संतोष गोटल, विभूतवाडीचे सरपंच सुरज पाटील, नाना मोटे, सुखदेव खताळ विभुतवाडी , शंकरराव गळवे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.आभार दैनिक प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके यांनी मानले.
प्रारंभी पाणी चळवळीतील सर्व दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद