तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोठे-माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख


‘आटपाडी भूषण’ पुरस्काराने कर्तृत्ववानांचा गौरव,पत्रकारांचा सन्मान
इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मिडीया वेल्फेअर असोसिएशन आटपाडीच्या वतीने पत्रकार दिन साजरा
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी तालुक्याच्या विकासामध्ये पत्रकारांचे योगदान जास्त असून पत्रकारांनी लेखणीचा आतापर्यंत योग्यप्रकारे उपयोग केलेला आहे, यापुढेही करावा असे आवाहन ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आटपाडी येथे केले.

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आटपाडी येथील आटपाडी पंचायत समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख सभागृहामध्ये इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वेल्फेअर असोसिएशन आटपाडीच्या वतीने आयोजित ‘पत्रकार दिन व आटपाडी भूषण सन्मान सोहळा २०२४’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मान्यवरांचे हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर,भाजपा युवा मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील, आटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुमनताई देशमुख,आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, सहायक गट विकास अधिकारी सचिन भोसले, आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे, तालुका पुरवठा अधिकारी दादासाहेब पुकळे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे,यांच्यासह तालुक्यातील राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
यावेळी ‘आटपाडी भूषण’ पुरस्काराने डॉ.विनय पतकी,डॉ. सतीश देशमुख, डॉ. गजानन मोरे, आटपाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली पाटील,धावडवाडीचे सरपंच इन्नुस शेख, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश साळुंखे, कवी व सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार,संघटक अरविंद चांडवले, आदर्श शिक्षक हैबतराव पावणे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोटे, खरसुंडीचे माजी उपसरपंच अर्जुन पुजारी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया वेल्फेअर असोसिएशनचे प्रशांत देशमुख, हाबीब मुलाणी, अशोक पवार, शिवानंद क्षिरसागर, राजू शेख, लक्ष्मणराव खटके, मदन जावीर, नंदकुमार विभुते, मोहनराव पुजारी, अंकुश मुढे, दादासाहेब वाक्षे, तुकाराम गिड्डे,पी.एस.पांढरे,मंजुषा पवार, प्रदीप देशमुख, समाधान जगदाळे, सुशांत गायकवाड या पत्रकारांचा ‘आदर्श पत्रकार’ सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे कामकाज करणाऱ्या वैद्यकीय, प्रशासकीय, घटनात्मक, कला, साहित्य ,संस्कृती, व अन्य क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.


तेज महाराष्ट्राचे संपादक प्रशांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले व दै.प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके यांनी आभार मानले.
आटपाडी तालुक्यामध्ये प्रथमच पत्रकार संघटनेकडून तालुक्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात आल्याने तालुक्यातील अनेक मान्यवरांनी इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मिडीया वेल्फेअर असोसिएशन आटपाडीच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.


कार्यक्रमात बोलताना माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, पत्रकारांनी सर्व घटकांची जाणीव ठेवून विविध क्षेत्रातील गुणवंतांचे चांगल्या पद्धतीने कौतुक करण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्याच्या विकासासाठी पत्रकारांचे योगदान जास्त आहे. पत्रकारांची लेखणी जेवढी कडक चालेल, तेवढे लोकप्रतिनिधी पत्रकारांच्या मागे असतील.चुकीचं काम होत असेल तर ते रस्त्यावर आणणे, एवढी लेखणीमध्ये ताकद आहे. तिचा उपयोग योग्यप्रकारे आतापर्यंत आपण केलेला आहे, पुढेही करावा. आतापर्यंत आपण चांगले कार्यक्रम घेत आलेलो आहोत, यापुढेही आणखी चांगले कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन करून सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यावेळी बोलताना म्हणाले, समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब पत्रकार दाखवितात.आता माध्यमे बदलली आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून खूप मोठा अंकुश ठेवण्याचे काम घडत आहे.

नकारात्मक बातमीचा विचार, त्यावर चिंतन करून आपले विकासाचे धोरण ठरवण्यासाठी राज्यकर्त्यांनी बातमीचा उपयोग केला पाहिजे. पत्रकारांनी समाजातील घटकांचा केलेल्या सत्काराच्या माध्यमातून त्यांना नवी ऊर्जा मिळेल.
समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर बोलताना म्हणाले, आटपाडी तालुक्यात पत्रकार चांगल्याप्रकारे काम करत असून आम्ही सर्वांसोबत आहोत. आपल्या अडीअडचणी सोडवू. राजेंद्रअण्णा देशमुख व आमदार पडळकर यांच्या माध्यमातून पत्रकारांची मागणी पूर्ण करु. तालुक्यात पत्रकार भवनसाठी आमदार पडळकर यांच्या माध्यमातून चांगला निधी देऊ. तालुक्यात आपण चांगल्या पद्धतीने काम करता, तालुक्याच्या जनतेसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन करीत पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे बोलताना म्हणाले, एमपीएससीच्या परीक्षेची सुरुवात आम्ही वृत्तपत्र वाचनाने करायचो. करियर घडवण्यासाठी शिक्षक, आई-वडील, यांच्यासह पत्रकारांचे महत्त्व मोठे आहे,त्यामुळेच करिअर घडले. पत्रकारिता म्हणजे टीकात्मक परीक्षण नाही तर समाजाला मार्गदर्शन करणे आहे. समाजाचा आवाज म्हणून पत्रकार पुढे येत असतील तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपणाला आदर्श काम करता येईल.शासन आणि पत्रकारांनी समाजासाठी एकत्र येऊन समूहाने पुढे काम केले पाहिजे, एकत्रित काम करून आदर्श ठेवूया असे म्हणून पत्रकारांच्या सुरक्षेतेची हमी देऊन पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
आर पी आय चे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.