
राजेवाडी येथे संविधान दिनानिमित्त व्याख्यान व सत्कार समारंभ संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
भारतीय संविधानाची पारायणे व्हावीत असे मत प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी राजेवाडी ता.आटपाडी येथे संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले. यावेळी इयत्ता १०वी व १२वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार,कु.पायल नांदुगडे हिचा राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच निवृत्त अधिकारी मा.नंदकुमार साबळे, मंडळ कृषी अधिकारी, पुणे. यांचाही सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतीय संविधानाने सर्वांना समान न्याय हक्क व स्वातंत्र्य दिले आहे.भारतीय संविधानाच्या मूलतत्त्वांची व्याप्ती त्याची सर्व समावेशकता आणि या देशाला अपेक्षित असणारे सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी हे संविधान जी भूमिका निर्माण करते ती भूमिका नव्या पिढीपर्यंत जाणे अपेक्षित आहे. यासाठी 2015 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 26 नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. या दिवसाचे महत्त्व म्हणजे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती सन्मान व्यक्त केला जावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाची जागृती सामान्य माणसापर्यंत होत रहावी हा आहे.
26 नोव्हेंबर हा दिवस स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून पाळला जात होता. मात्र 2015 नंतर तो संविधान दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्या माध्यमातून संपूर्ण देशात यामध्ये असणारे नियम आणि कायदे, हक्क आणि अधिकार यांची जाणीव सामान्य माणसाला होण्यासाठी त्याच्या जागृतीची गरज म्हणून या दिवसाचा सोहळा करायलाच हवा असेही ते म्हणाले.
संविधान दिवसाची गरज यासाठी आहे की तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याचा अनुभव आणि उपभोग तुम्हाला घेता आला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून स्वतःचा विकास करताना राष्ट्राचा विकास साधला पाहिजे.
संविधानाने आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. नागरी स्वातंत्र्य,श्रध्दा, उपासना यांचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याबरोबरच काही कर्तव्य दिली आहेत.तीही आपण पाळायला हवीत.त्यामध्ये राष्ट्रीय चिन्हांचा आणि राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखायलाच पाहिजे व देशाचे अखंडत्व व सार्वभौमत्व टिकवायलाच हवे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न,आदिवासींचे प्रश्न,पर्यावरणाचे प्रश्न,महिलांचे प्रश्न,कामगारांचे प्रश्न यासाठी समाजसेवक लढा देताना आपल्याला दिसतात.मात्र ही त्यांची कामे नसून राज्यसंस्थेची कामे आहेत.संविधान आम्हाला मतदानाच्या माध्यमातून राज्यसंस्थेवर अंकुश ठेवण्याचा अधिकार देते.
छत्रपती शिवरायांनी लोकांना संघटित करून राज्य उभा केलं तुम्ही सर्वजण एकत्र आला तर काही उदात्त,भव्यदिव्य घडविता येईल.आणि हा एकत्र येण्याचा अधिकार देखील संविधान आपणास बहाल करते.
“भारताच्या संविधानाची पारायण व्हायला हवीत”. ज्याने आम्हाला जगण्याचं मोल आणि न्याय दिला,हक्क आणि अधिकार दिले. या कार्यक्रमाचे आयोजक,असे कार्यक्रम घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणारे, व असे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व कौतुक करायला हवे, असे मत त्यांनी व्याक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा.शरद मेमाणे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस यंत्रणेचे “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद वाक्य राज्यघटनेवर आधारित असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.शरद मेमाणे साहेब पोलीस निरीक्षक,मा.मुक्तेश्वर माडगूळकर गटविकास अधिकारी, मा. प्रशांत शिरकांडे सरपंच, मा. सुनिता माने उपसरपंच, मा. संजय कर्णे ग्रामसेवक,मा.सचिन हेगडे पोलीस पाटील,मा.भगवानराव हेगडे साहेब,मा.श्रीनिवास कुंभार साहेब, मा.अनिता माने, मा. साहेबराव चंदनशिवे मा.बाळासाहेब पाटील, मा.रवींद्र शिरकांडे,मा.विनायक आवारे,मा.नवनाथ मोरे साहेब हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सागर डोंगरे सर यांनी तर वक्त्यांचा परिचय श्री.संजय कुंभार सर यांनी केला. अध्यक्ष निवडीचे अनुमोदन श्री अजय साबळे सर यांनी दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.विष्णू पुंड साहेब हे होते,आभार श्री. राहुल साबळे तर सूत्रसंचालन प्रा. विकास हेगडे सर यांनी केले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद