आटपाडी पोलिसांनी चोरीचे सहा गुन्हे केले उघड

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी पोलिसांनी आरोपीकडून विविध सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आणून २,१४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणांतील आरोपी देवगण बापू उर्फ विजय पवार या अटक करण्यात आली आहे,तर कैलास रणदिवे यास नोटीस घेण्यात आलेली आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१२/०८/२०२३ रोजी रात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास प्रवीण भास्कर भांबुरे यांच्या बंद घराची कडी खिडकीतून काढून बेडरूममध्ये असलेले साहित्य चोरून नेल्याबाबतची आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती.
पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब ठोंबरे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून गुन्ह्याची चोरी ही देवगण विजय पवार याने केलेली असून तो माळशिरस एसटी स्टँड येथे असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली. त्यास माळशिरस येथे स्टँडवरून पकडून त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या पाटल्या,सात ग्रॅम वजनाची १८ हजार रुपयांची सोन्याची एक चैन, अडीच ग्रॅम वजनाची ६५०० रुपयाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.तसेच आटपाडी पोलीस ठाणे हद्दीत एक व पारगाव खंडाळा येथील गोपीचंद विष्णू हर्णे यांची एक अशा दोन हिरो कंपनीच्या स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. त्याही हस्तगत केल्या आहेत. तसेच दिघंची येथील किरण सुखदेव पुसावळे यांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल चोरी केल्याची कबुलीही त्याने दिली. त्याच्याकडून असा एकूण दोन लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम,पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब ठोंबरे, पोलीस हवालदार विजय कदम, राजेंद्र कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ पाटील, पोलीस गजानन देशमुखे, विष्णू बोईनवाड, महिला पोलीस साधना शेडगे, जयश्री जाधव, चालक कुंडलिक घेरडे, दत्तात्रय कांबळे,अमोल मोहिते यांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी आरोपी कैलास सर्जेराव रणदिवे (वय ४२ वर्षे,रा. फोंडशिरस ता. माळशिरस जि. सोलापूर यास दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नोटीस देण्यात आलेले असून आरोपी देवगण पवार यास २४.१०.२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे.