एसटीच्या चाकाखाली चिरडून दोन महिन्याच्या बालकाचा मृत्यू

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी चौकात एसटीच्या बंपरला मोटरसायकल घासल्याने मोटरसायकलवरील दोन महिन्याच्या बाळाचा एसटीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद अनिल परशू माने रा.म्हसवड ता.माण यांनी आटपाडी पोलिसांमध्ये दिली आहे.
आटपाडी पोलिसांनी घटनेबाबत दिलेली माहिती अशी की, दि.२६ रोजी ५.०० वाजण्याच्या सुमारास नेलकरंजी ते खरसुंडी जाणाऱ्या रस्त्यावर नेलकरंजी गावच्या चौकात अनिल माने त्यांच्या मोटरसायकल क्र.एम एच ११ बी ई ०८१३ वरून मुलगी आराध्या तसेच पाठीमागे पत्नी व त्यांच्या हातात दोन महिन्याचे बाळ हर्ष असे त्यांच्या म्हसवड गावी निघाले होते. एसटी ड्रायव्हर पांडुरंग लक्ष्मण हातेकर (वय ३३ वर्षे) रा. सोमेश्वर नगर, आटपाडी याने त्याच्या ताब्यातील एसटी क्रमांक एम एच १० डी टी ३८६० इंडिकेटर न देता उजव्या बाजूस वळवल्याने एसटीच्या बंपरला मोटरसायकल घासल्याने माने यांचा दोन महिन्याचा मुलगा हर्ष उजव्या बाजूच्या चाकाखाली पडून एसटीचे चाक त्याच्या अंगावरून गेले व त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक पांडुरंग हातेकर याच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. ते पुढील तपास करीत आहेत.