देवानंद जावीर/ आटपाडी, प्रतिनिधी:
22 मार्चपासून कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने देशात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये हातावर पोट असलेले शेतकरी,मजूर,गोरगरीब, कष्टकरी, कामगारांची, शेतकऱ्यांची,मजुरांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.अशा भयानक परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीने निर्दयपणे लोकांना रिडींग न घेता अमाप बिले दिली आहेत. ते तीन महिन्याचे लाईट बील पूर्णपणे माफ व्हावे तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा रिपोर्ट त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला दिला जावा,अशा अनेक मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीचे आटपाडी खानापूर विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी पंचायत समितीच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे नेते शंकर दादा माने,हंबीरराव जावीर, संजय हेगडे अशा अनेक तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तहशिल कार्यालय आटपाडी या आवारात आंदोलन करण्यात आले.त्यावेळी बहुजन समाज पार्टीचे नेते शंकर दादा माने व संतोष हेगडे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये बहुसंख्य कामगारांच्या हाताला काम नव्हते. त्यांना घरात बसून दिवस काढावे लागले.हाताला काम नाही, तर पैसे नाहीत, पैसे नाहीत जगायचं मुश्कील झालं होतं.अशा परिस्थितीमध्ये महावितरण कंपनीने लादलेले तीन महिन्याचे बील तातडीने माफ करावे,तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा रिपोर्ट त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला दिला जात नाही.पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह रिपोर्ट कोरोनाची चाचणी केलेल्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला दिला जावा .तसेच शासनाकडून कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात यावे. अशा अनेक मागण्यांसाठी आटपाडी तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.यावेळी सोशल डिस्टन्सिंचा वापर करून मास्क लावून हे आंदोलन करण्यात आले.


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद