करगणीचे खरे भुमीपुत्र, आटपाडीचे निसर्गभुषण – सर्जेराव खिलारी वकील : सादिक खाटीक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी

उच्च विद्याविभुषीत, चतुरस्त्र वाणी, सखोल ज्ञानी, अभ्यासू विचारवंत, अंधश्रद्धांचा कर्दनकाळ, काळासावळा, देखण्या देहयष्टीचा, उंच, धिप्पाड व्यक्तीमत्वाचा, उभे आयुष्य शेती, शेती परिवार, निसर्ग निसर्गातील, वृक्ष – वल्ली, पशु – पक्षी इत्यादी सर्वांशी प्रेमाने समर्पित झालेला अवलिया म्हणजे करगणीचे भुषण सर्जेराव रंगनाथ खिलारी हे होत .
१९८७ – ८८ साल असेल . माझी पत्रकारीता हळू हळू बाळसे धरू लागली होती . तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून राज्यभर ओळख असणारे बाबासाहेब देशमुख दादांच्या निधनानंतर राजेंद्रआण्णा देशमुख या युवा नेत्याचे नवे राजकीय पर्व सुरू झाले होते . बेरजेच्या राजकारण करण्याच्या आण्णांच्या त्यावेळच्या भूमिकेने त्यावेळचे देशमुख गटाविरोधातील अनेक कार्यकर्ते आण्णांच्या साथी – शिलेदारात समावेश झाले होते . त्यातीलच एक आघाडीचे नाव सर्जेराव खिलारी या तरुण नेत्याचे होते .
करगणी म्हंटले की आण्णासाहेब पत्की आणि त्यांचे सहकारी दगडूनाना पाटील ही जोडगोळी तालुक्याला माहीत होती . नव्याने राजकारणात उतरलेल्या विजयसिंह पाटील – सर्जेराव खिलारी या जोडीने पहिल्यांदा आण्णासाहेब पत्की यांच्या अभेद्य सत्तेला हादरा देत ग्रामपंचायतीतील सत्तापरिवर्तनाने तालुक्याचे लक्ष वेधून घेतले . सरपंच विजयसिंह पाटील, उपसरपंच सर्जेराव खिलारी असा राजकीय प्रवास सुरु केलेल्या या जोडीने तालुका, जिल्हा स्तरावर उच्च पदे भुषवित आपल्या लोकाभिमुख कार्याचा दबदबा अनेक वर्षे चालू ठेवला .
विजयसिंह पाटील पं. स . आणि जि.प. सदस्य, पंचायत समितीचे उपसभापती, सभापती पदापर्यत पोहोचले तर सर्जेराव खिलारी यांनी आण्णासाहेब पत्की यांच्या सभापती पदाच्या दशकपूर्ती नंतर तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सलग दहा वर्षे सभापती बनण्याचा बहुमान संपादन केला . या काळात सर्जेराव खिलारी हे व्यक्तीमत्व राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या राजकारणातले हुकमी पान किंवा परवलीचा शब्द ठरणारे अति महनीय व्यक्तीमत्व ठरले होते . सख्ख्या भावाच्या अतुट नात्यासारखे वागलेल्या या जोडगोडीच्या दोस्तीपर्वाच्या कालखंडात राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या राजकारणातल्या यशस्वीतेने खुप मोठी झेप घेतली होती . जवळ जवळ ८० टक्के तालुक्यावर, तालुक्यातील सर्व महत्वपूर्ण संस्थावर, बहुतांश ग्रामपंचायती, सेवा सोसायट्या, पंचायत समिती, जि . प . सदस्य, वगैरे जवळजवळ सबकुछ देशमुख गट, असे स्थितीत असणाऱ्या आपल्या नेत्याला आमदार करायचे, कुणाची हां जी, हां जी न करता, कृष्णामाईला आपणच भागात आणायचे, खानापूरकरांच्या जोखडातून तालुक्याला स्वतंत्र बनवायचे, अशा स्वप्नवत कल्पनांचे, नेत्याजवळ विचार पेरणारात अनेक जणात एक नाव आघाडीवर होते . अर्थात ते नाव होते सर्जेराव खिलारी यांचे .
खिलारी वकील तसे उपेक्षित, वंचित, मागास, कष्टाळू, सोशीक अशा लोणारी समाजातील एक युवक, वडिल बंधू ज्ञानेश्वर माऊली यांच्या राजकीय वाटचालीतून राजकारणात खेचले गेलेले . घरचे दुध विकले तर देवादिकांच्या कोप होतो, अशा अनेक अंधश्रद्धात भिवून राहणाऱ्या बुबा, देवरुषी वगैरेशी सतत संपर्कात राहणाऱ्या समाजबांधवांना, शहाणे डोळस बनविण्याचे काम खुले आमपणे खिलारी वकिलांनी दुध डेअरीच सुरु करून केले . स्वतःच्या घरचे, समाजबांधवांच्या दारातल्या जनावरांचे दुध विकून देवादिकांचा कसलाही कोप होत नसल्याचे, त्यांच्या समाजात महाराष्ट्रात पहिल्यांदा दाखवून देण्याचे खिलारी वकीलांनी केले . विषारी सापांनी खचाखच भरलेल्या, रानटी झाडा झुडुपांनी वेढलेल्या, ओबडधोबड, डोंगराळ जमिनीत, दिवसा फिरायचे म्हंटले काळजात धस्स व्हायचे . अशा व्हराड खडीच्या खोराड्याला निसर्गाचे वरदान भासावे इतके सर्वागसुंदर, सदाबहार बनविण्याची किमया या अवलियाने केली . पाच पन्नास प्रकारच्या वनस्पती, झाडे,फळझाडे,वेगवेगळ्या भाज्या, नानाप्रकारची झाडे, बगिच्याला मागे सारतील अशी फुल झाडे अशा शेकडो रोप – वृक्षराजींची मांदियाळी निर्माण करणाऱ्या सर्जेराव खिलारींनी, पशुपक्ष्या सह दारातल्या लहान मोठ्या जनावरांवर अतुट – अजोड असे प्रेम केले . दुष्काळी माळरानावरील हा हिरवाईचा समृद्ध प्रयोग बघायला राज्यातून – परराज्यातून आलेल्या हजारो पर्यटकांना खायला प्यायला घालून, त्यांचे शाल श्रीफळ फेटा शेतातल्या फुलांच्या गुच्छाने आदरातिथ्य केल्याशिवाय त्यांना सोडले नाही . समाज घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची दखल घेऊन नाव कमावणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीवर आशिर्वादाची थाप देणारात सर्जेराव खिलारी हे सर्वात पुढे असणारे व्यक्तीमत्व होते . आपल्या या निसर्ग कुटीत – लाल दिव्याची गाडी यावी, ही त्यांनी सहज बोलून दाखविलेली भावना, तत्कालीन मंत्री, आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या कानी घालीत त्यांना येथे आणून वकीलांची निसर्गातील नवी दुनिया दाखविण्यात मला खारीची भूमिका बजावता आली होती . हे माझे भाग्य होते . जि.प . तत्कालीन मुख्याधिकारी गोविंदराज यांनाही त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीसह या खेराड्यात नेण्यात ही वकीलांवरील निखळ प्रेमातून मी यशस्वी झालो होतो . निसर्गाचा प्रचंड कायापालट करण्याच्या त्यांच्या अजस्त्र प्रयत्नांना राज्य शासनानेही कृषी भुषण पुरस्काराने सन्मानीत करून राज्यभर त्यांचा नावलौकीक केला होता . कवी, लेखक, कलाकार, नकलाकार, लोककलाकार, शिक्षक, वकील, डॉक्टर, पत्रकार, समाजातील सर्व स्तरावर चमकणारे प्रज्ञावंत, गुणवंत, जवळ जवळ सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी वकीलांची कुदरत की नयी जिंदगी बघीतली होती . येथे सन्मानीत होण्याचा योग साधला होता . खरोखरच वकीलांचा तो ती दशकांचा काळ जादुमयी होता . त्यांच्या सानिध्यात जाणारा प्रत्येक जण त्यांच्या मित्र परिवारात हमखास जोडला जायचा . तासनतास, नर्म विनोदी, मार्मिक आणि उपदेशपर बोलणाऱ्या या अवलियाचे जगच वेगळे होते .
३८ वर्षापूर्वी झालेल्या भीषण अपघातात पत्नीसह आप्तस्वकीयांना गमावलेल्या आणि जीवघेण्या अपघातातून अनेक महिन्याच्या उपचाराने वाचलेल्या, वकीलांनी ताठ मानेने, कणखर वृत्तीने उभे रहात पुढचा प्रचंड इतिहास घडविला . तथापि साखरेचा आजार आणि त्यातून उदभवलेल्या विविध आजारांनी गत काही वर्षे त्यांची पाठच सोडली नाही . त्यातच आज त्यांच्या निधनाच्या वार्तेने मन सुन्न झाले . सकाळी दिलेले रक्त लघवी तपासणीचे आलेले रिपोर्ट घेवून आईला औषधोपचारासाठी सांगलीला घेवून चाललो होतो . चार चाकीत बसत असतानाच , भावाच्या आलेल्या फोनने, वकीलांच्या निधनाची बातमी समजली . सांगली जाण्याचे उद्यावर ढकलले . अन गत ३५ वर्षाच्या साथसंगतीचा आलेख डोळ्यापुढे तरंगला आणि त्यातूनच वकीलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिहिले गेलेले हे चार शब्द ……
प्राणप्रिय मार्गदर्शक मित्र, सर्जेराव खिलारी वकील साहेबांच्या पवित्र आत्म्यास परमेश्वराने चिरशांती द्यावी . हे प्रचंड दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला द्यावी . अलविदा ! वकील साहेब, अलविदा ,
तुम्हें आखीरका सलाम ! आखिरका सलाम !!
विधाता, आपको स्वर्ग – जन्नत नशीब करे .