
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
जांभुळणी येथील ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी गावठाण हद्दीमध्ये अतिक्रमणे करून बेकायदेशीर बांधलेली घरे काढून त्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ यांनी २ ऑक्टोबर, गांधी जयंती दिनापासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
जांभुळणी येथील ग्रामपंचायत सदस्य सौ.वनिता दत्तात्रय पाटील,मोहन सुनील माने व सौ.रेश्मा यशवंत वाघमारे यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी गावठाण हद्दीमध्ये अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या घरे बांधलेली आहेत. याबाबत ग्रामपंचायतीसह वरिष्ठ प्रशासनाकडे अतिक्रमणे काढण्याबाबत व सदस्यत्व रद्द करण्याचा अहवाल करण्याबाबत मागणी केली होती.गटविकास अधिकारी यांनी सरपंच,ग्रामसेवक यांना अतिक्रमण काढण्याबाबत कळवले होते. त्याबाबत विस्तार अधिकारी एस.एच.शिर्के यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी कळविले होते. परंतु पंचायतीने व विस्तार अधिकारी शेळके यांनी संगणमताने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यानंतर स्मरणपत्रे देऊनही अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याबाबत व त्याचा चौकशी अहवाल मिळणेबाबत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.
गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवूनही ग्रामपंचायतच्या सदस्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे गावातील ग्रामस्थ सुद्धा अतिक्रमणे करत आहेत व ग्रामस्थांमध्ये अतिक्रमण करण्याची स्पर्धा लागलेली आहे.ग्रामपंचायतीची निवडणूक होऊनही सुमारे नऊ ते दहा महिन्याचा कालावधी झाला आहे. या कालावधीत सहा ते सात अतिक्रमणे ग्रामपंचायतीच्या पाठबळाने झाल्याचे दिसत आहे. यामुळे यापुढे गावात विकासकामांसाठी रिकामी जागा शिल्लक राहणार नाही हे स्वच्छ व सत्य आहे.
या सर्व बाबींची कल्पना ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना योग्य त्यावेळी देण्यात आलेली होती व त्यांच्याकडे अतिक्रमणे काढून सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अहवाल बनवण्याची मागणी केलेली होती. परंतु त्यावर आतापर्यंत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तसेच कोणतेही अतिक्रमण काढण्यात आलेले नाही किंवा अहवालाबाबत कारवाई करण्यात आलेले नाही. कारवाई करणेबाबत सरपंच, उपसरपंच व काही सदस्य यांनी नाकर्तेपणा दाखवल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच यांचे सदस्य मंडळ बरखास्त करण्याची मागणी मासाळ यांनी केली आहे. यासाठी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपासून आटपाडी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे मासाळ यांनी सांगितले.त्यांना मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार असतानाही ते उपोषण करणार असल्यामुळे प्रशासनापुढे नाकर्तेपणाचा धोका वाढणार आहे.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद