जळभावी घाटात दरोडा टाकलेले तीन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी

माळशिरस/ प्रतिनिधी :
जळभावी घाटात ट्रक अ2डवून चालकास व त्याच्या साथीदारास मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम रूपये वीस हजार व दोन मोबाईल असा एकूण ४८ हजार आठशे रूपये माल लुटल्यातील तीन आरोपी जेरबंद करण्यात आले. त्यातील मोबाईल व ३ मोटार सायकल ताब्यात घेतल्या आहेत. रामभाऊ श्रीमंत सूर्यवंशी (फडतरी ता.माळशिरस ),सतीश बापूराव रूपनवर (रा.लोणंद ता.माळशिरस ),विशाल दत्तात्रय पवार (रा.कळबोली ता.माळशिरस )अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
    याबाबत मिळालेली माहिती अशी की,एम एच ११  ए एल ०९७७  हा मालवाहतूक ट्रक बीड येथून हरभरा घेऊन चिपळूणकडे चालला असता राञी ९  ते साडेनऊच्या दरम्यान माळशिरस–म्हसवड रस्त्यावर जळभावी घाटामध्ये दुचाकी वरून आलेल्या २० ते २५ वयोगटातील सात इसमांनी ट्रकच्या काचेवर दगड मारून ट्रक थांबविला. चालक कृष्णा बाबासाहेब सानप ( रा.बाडकी ता.शिरूर जि.बीड ) व त्याचा साथीदार विजय हरिभाऊ पाखरे ( रा.बीड ) या दोघांना मारहाण करून ,चाकूचा धाक दाखवून, शिवीगाळ करीत त्यांच्या जवळील रोख रक्कम रूपये वीस हजार व दोन मोबाईल असा ४८  हजार आठशे रूपयांचा मुद्देमाल दरोडा टाकून लुटून नेला होता. याबाबतची तक्रार चालकाने माळशिरस पोलिसांत दाखल केली.
   पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या तपासकामी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या पथकाची  नेमणूक केली होती. पथक तपास करीत असताना त्यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की,हा गुन्हा सुरज वाघमोडे ,विशाल पवार (दोघेही रा. कळबोली ता.माळशिरस )यांनी त्यांच्या इतर साथीदार यांनी केला असून सदरचे आरोपी दहीगाव चौकात थांबल्याचे समजले .पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांच्या पथकाने  रामभाऊ श्रीमंत सूर्यवंशी (फडतरी ता. माळशिरस ),सतीश बापूराव रूपनवर (रा.लोणंद ता.माळशिरस ),विशाल दत्तात्रय पवार (रा.कळबोली ता.माळशिरस) यांना तीन मोटार सायकल व मोबाईलसह ताब्यात घेतले.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरुण सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घोळवे, पोलीस हवालदार नारायण गोलेकर ,मनोहर माने ,विजयकुमार भरले ,मोहन मंनसावले,रवी माने ,केशव पवार यांनी केली.या आरोपींना  माळशिरस पोलिसांच्या ताब्यात दिले असून माळशिरस पोलीस पुढील तपास करीत आहेत.