३३ वर्षे फरारी आरोपीला आटपाडी पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

१९९० सालापासून ३३ वर्षे फरारी असणाऱ्या आरोपीला आटपाडी पोलिसांनी धायटी ता. सांगोला येथून ताब्यात घेतले. भारत सुबराव काळे, (वय ६२ रा. धायटी ता. सांगोला मुळगाव करगणी ता. आटपाडी) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ३१ जानेवारी १९९० रोजी भारत सुबराव काळे हा गुन्हा दाखल झालेला आरोपी सुमारे ३३ वर्षे परागंदा होता. त्यामुळे गुन्ह्यातील चोरीला गेलेले १०६ ग्रॅम सोन्याचे दागिने व लगड तसेच चांदीचे दागिने असा मुद्देमाल न्यायालयाने मूळ फिर्यादी यांच्या ताब्यात दिलेला नव्हता. या आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केल्याशिवाय हा मुद्देमाल ताब्यात देता येणार नाही, असा न्यायालयाचा आदेश होता. सदरचा आरोपी हा धायटी येथे राहत असल्याबाबत बातमी मिळाल्यानंतर आटपाडी पोलिसांच्या पथकाने ३० जुलै रोजी रात्रीच्या वेळी सांगोला पोलीस ठाणे येथून मदत घेऊन या आरोपीचा शोध घेतला. धायटी येथून त्याला ताब्यात घेऊन आटपाडी पोलीस ठाण्यास आणण्यात आले.या आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवण्याची तजवीज ठेवण्यात आली असून त्यानंतर मयत असलेले फिर्यादी यांचे नातेवाईकांना एकूण १०६ ग्रॅम सोन्याचे दागिने व लगड तसेच चांदीचे दागिने असा मुद्देमाल ताब्यात मिळण्यास मदत होणार आहे. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमर फकीर, शंकर पाटील, पोलीस नाईक नितीन मोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद रोडे, महेश काळे,अमोल पाटील यांनी ही कारवाई केली. शंकर वासुदेव देशपांडे रा. कौठुळी ता आटपाडी यांनी त्यावेळी ही फिर्याद दिली होती.