आटपाडी तलावात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील तलावात विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या दोघाजणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. अनिकेत अमृता विभुते (रा.माडगुळे) व विलास मारुती गुळदगड (रा.शेवते) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी येथील तलावातून माडगूळे येथील काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने पाईपलाईन करून शेतजमिनीला पाणीपुरवठा केला आहे. यातील एक विद्युत मोटार सुरू करण्यासाठी अनिकेत अमृता विभुते व विलास मारुती गुळदगड हे दोघे माडगूळे येथून आटपाडी तलावात दुपारी दोनच्या सुमारास गेले होते. तलावामध्ये बॅरलच्या मदतीने पाणबुडी मोटर सोडण्यात आली होती. त्यावेळी त्यांना विजेचा धक्का लागला.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना समजतात परिसरातील व माडगूळे येथील लोकांनी तेथे धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.पोलीस पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले.