सायकल खेळायला म्हणून गेला,अन् परत आलाच नाही!

कॅनॉलमध्ये आढळला सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह
चांदापुरीतील सात वर्षाच्या बेपता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये महुदनजीक आढळला
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील सरफराज नाशीक पठाण ( वय ७) हा मुलगा १३ एप्रिल रोजी आपल्या घरुन मित्राकडे सायकल खेळण्यासाठी जातो म्हणून गेला, तो परत आलाच नाही. मग घरातील लोकानी त्याचा नातेवाईक,मित्र यांच्याकडे शोध घेतला.परंतु त्याचा शोध लागलाच नाही. नंतर पिलीव पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली. १४ एप्रिल रोजी महुद ता.सांगोला येथील पवारवाडी गावाजवळील निरा उजव्या कॅनॉलमध्ये धुळा कोळेकर यांना तरंगताना दिसला. त्यांनी पिलीव येथील नानासाहेब मदने यांना त्यांनी त्या मुलाचा फोटो पाठविला.तो सदरचा फोटो नातेवाईकांना पाठविला असता तो फोटो सरफराज पठाण याचाच असल्याची खात्री पटली .सरफराज हा सायकल खेळण्यासाठी म्हणून गेला तो परत आलाच नाही. त्याचा दुर्दैवी मृत्यू कसा झाला याची चर्चा सध्या चांदापुरी परीसरात सुरु असुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या उन्हाळायाचे दिवस आहेत शाळांना सुट्टी लागली आहे. लहान मुले पोहण्यासाठी विहीरीवर , कॅनॉलमध्ये जात आहेत. चांदापुरी येथील घटनेनंतर पिलीव येथील तिसरीतील लहान मुलाचा पोहायला गेल्यानंतर विहीरीत बुडुन मृत्यु झाला .पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.