देवदर्शन करुन परत जाताना ट्रॅक्टरच्या धडकेने एक ठार, एक जखमी

झरेनजीक घोरपडेवस्ती जवळील घटना
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातील झरे गावानजीक घोरपडे वस्ती जवळ कुरुंदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर १० एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरने मोटरसायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वाघमोडेवस्ती, रेवनाळ ता.जत येथील सखाराम धुळा वाघमोडे ठार झाले असून शामराव उमाजी बंडगर गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक विष्णू सुभाष खोत याच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. १० एप्रिल रोजी सखाराम धुळा वाघमोडे रा. वाघमोडे वस्ती, चांदणी चौक, रेवनाळ ता.जत जि.सांगली हे मोटरसायकल (क्र. एम एच १४ ए जे ५७८२) वरून कुरुंदवाडी ता.आटपाडी येथे बिरोबा देवाच्या दर्शन करून परत रेवनाळकडे जात होते. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घोरपडेवस्तीजवळ झरे गावाकडून कुरुंदवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विष्णू सुभाष खोत हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (एम एच १० डीव्ही ६८३६) भरधाव वेगाने चालवत असताना धडकेत सखाराम धुळा वाघमोडे यांना गंभीर जखमी झाले व त्यातच त्याचा मृत्यू झाला. मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेले शामराव उमाजी बंडगर रा.वाघमोडेवस्ती, चांदणी चौक, रेवनाळ ता. जत जि. सांगली हेही गंभीर जखमी झाले.
याबाबतची फिर्याद भगवान धुळा वाघमोडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पुकळे करीत आहेत.