आटपाडी पोलिसांनी पकडले सराईत मोटरसायकल चोर

१५ मोटारसायकलसह ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी पोलिसांनी दोन सराईत मोटरसायकल चोरांना पकडले असून १५ मोटरसायकलसह ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिघंची येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांच्या मुसक्या आवळता आल्या. अजित भगवान खरात (वय २० वर्षे, रा. लेंगरेवाडी ता. आटपाडी जि. सांगली) व रोहित बाळू शिंदे (वय २६ वर्षे, रा. करगणी ता. आटपाडी जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत आटपाडी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिघंची येथे ५ एप्रिल रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दिघंची शाखेच्या इमारतीसमोर रस्त्याकडेला राजेंद्र श्रीरंग मोरे यांनी त्यांची मोटार सायकल (क्रमांक एम एच १० बी पी ६३४४) ही गाडी लॉक न करता लावलेली होती. ती तेथून चोरून नेल्याबाबतची आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी फिर्याद दिली होती.
जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत तपास पथकाला सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने गुन्ह्याचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना या फुटेजमध्ये एक अज्ञात चोरटा ही मोटरसायकल चोरून नेत असल्याबाबत दिसून आले. त्याचा शोध घेत असताना ९ एप्रिल रोजी दिघंची परिसरात पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलीस पथकाला दिघंची एसटी स्टँड येथे रात्री ८ वाजता दोन संशयित व्यक्ती एका मोटरसायकलवर थांबलेले दिसून आल्या. संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. मोटरसायकलबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ती ८ एप्रिल रोजी फलटण जि. सातारा येथून बसस्थानक परिसरातून चोरली असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये नोंद असलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करून विश्वासात घेतले असता आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतून २, विटा येथून २, म्हसवड येथून ३, पंढरपूर शहर येथून ६, कराड येथून एक व फलटण शहर येथून एक अशा मोटरसायकल चोरी केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून एकूण १५ मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस हवालदार कोरवी, जाधव, कराळे, पाटील,मोरे, देशमुखे, सोनावणे, ढाले यांनी ही कारवाई केली.