बेडग येथे म्हैसाळ कालव्यात दोन तरुण बुडाले

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
बेडग

बेडग (ता. मिरज) येथे कामाचे साहित्य ठेवण्यासाठी आलेले दोन तरुण म्हैसाळ कालव्या त बुडाले आहेत तर त्यांच्या सोबत असणाऱ्या दोघांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बेडग येथील मंगसुळी रस्त्यावरील शिंदे वस्ती मधील एक व्यक्तीच्या घरी पीओपी चे साहित्य ठेवण्यासाठी माधवनगर येथील ४ जण आले होते. साहित्य उतरल्यानंतर जवळपास १ वाजण्याच्या सुमारास ते चारही युवक माघारी जात असताना म्हैसाळ योजनेच्या कालव्या वरून असलेल्या रस्त्यावरून मंगसुळी बेडग रस्त्याकडे जात असताना कालव्याचे पाणी पाहून त्यातील सलमान शौकत तांबोळी (वय २० वर्षे) व अरमान हुसेन मुलाणी (वय१६) हे गाडीतून उतरले व कालव्याच्या पाण्यात हात पाय धुण्यासाठी गेले तर नदीम मुलाणी व कुलदीप मौर्य हे गाडी जवळ थांबले होते.
सलमान याचा तोल गेल्याने तो कालव्यात पडला. कालव्यात पडताना लगतच असलेल्या अरमान याला ही धक्का लागला व तो ही पाण्यात पडला. हे पाहून गाडी जवळ असलेल्या नदीम मुलाणी याने पाण्यात उडी घेतली, त्याने सलमान चा हात पकडला परंतु पाण्याची गती जास्त असल्याने याला सलमान ला वाचवणे शक्य झाले नाही . तो ही वाहताना पाहून गाडीमध्ये बसलेल्या कुलदीप ने पळत जाऊन नदीम मुलाणी याला बाहेर ओढले.
यामध्ये सलमान व अरमान हे दोघे वाहून गेले. याची माहिती रेस्क्यू टीम ला दिल्यानंतर रेस्क्यू टीम दाखल झाली परंतु सायंकाळी ७ वाजले तरी अद्याप त्यांना दोघेही सापडले नाहीत
बचावकार्य जोरात सुरू आहे.